हुआवे कंपनीने आपला पी२० लाईट हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून हे मॉडेल अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे. हुआवे कंपनीने गत महिन्याच्या शेवटी चीनमध्ये पी२० आणि पी२० प्रो या मॉडेल्सचे अनावरण केले होते. तर याच्याच काही दिवसांपूर्वी पी२० लाईट मॉडेल सादर करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात यापैकी पी२० प्रो आणि पी२० लाईट हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली आहे. यातील पी२० प्रो हे मॉडेल फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील असून पी२० लाईट हा स्मार्टफोन मिड-रेंजमधील आहे.
हुआवे पी२० लाईट या स्मार्टफोनमध्ये ५.८४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आणि १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा आयपीएस एलसीडी डिस्प्ले असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण असेल. या डिस्प्लेभोवती अतिशय कमी रूंदीच्या कडा असतील. यात ऑक्टा-कोअर कोर्टेक्स-ए५३ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा इएमयुआय ८.० हा युजर इंटरफेस असेल. याच्या मागील बाजूस १६ आणि २ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजूंनी फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओ रेकॉर्डींग करता येणार आहे. तर फास्ट चार्जींगसह यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असणार आहे. तर यात फोर-जी नेटवर्क सपोर्ट व फिंगरप्रिंट स्कॅनरसह अन्य रेग्युलर फिचर्स आहेत. हुआवे पी २० लाईट हा स्मार्टफोन ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून १९,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे.