मुंबई - जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात इंटरनेटचा स्पीड श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही कमी असल्याचे समोर आले आहे. इंटरनेटची 4जी सुविधा वापरणाऱ्या भारतीय युजर्संना बफरींगच्या समस्येला आजही तोंड द्यावे लागते. त्यामुळेच भारतातील इंटरनेट स्पीड हा शेजारील श्रीलंका, म्यानमार आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही कमी आहे. इंग्लंडस्थित इंटरनेट स्पीड टेस्टर कंपनी ओपनसिग्नलने केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे.
भारतात सध्या 4 जी नेटवर्कचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यानुसार देशात 4 जी नेटवर्क अधिक प्रमाणात वापरण्यात येते. मात्र, भारतातील याच 4जी नेटवर्कचा स्पीड शेजारील श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांच्या तुलनेत कमी आहे. सध्या श्रीलंकेत (13.95Mbps), पाकिस्तान (13.56Mbps) आणि म्यानमारमध्ये (15.56Mbps) एवढा इंटरनेट स्पीड आहे. या देशांच्या तुलनेत भारताचा इंटरनेट स्पीड निम्माही नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. विकासाच्या बाबतीत हे देश भारताच्या कित्येक पटींनी पाठिमागे आहेत. मात्र, इंटरनेट स्पीडच्या बाबतीत हे देश जगातील सर्वात पुढारलेल्या देशांमध्ये आहेत. जगातील इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जगात अमेरिका, (16.31Mbps), इंग्लंड (23.11Mbps), आणि जपान (25.39Mbps) च्या गतीने अनुक्रमे 1,2 आणि 3 क्रमांकावर आहेत.
दरम्यान, अमेरिकेतील ओकला (Ookla) या कंपनीच्या इंटरनेट स्पीडच्या केलेल्या अभ्यासानुसार भारताचा जगात 109 वा क्रमांक लागतो. भारतात स्मार्टफोनमध्ये होणारी महाक्रांती आणि त्यामुळे वाढणाऱ्या इंटरनेट युजर्सची संख्या हे भारतातील इंटरनेट स्पीड कमी होण्याचे प्रमुख कारण आहे, असे ओपनसिग्नल कंपनीचे विश्लेषक पीटर बॉयलँड यांनी म्हटले आहे.