पॅनासोनिक कंपनीने अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्याभराचा विचार केला असता, एल्युगा रे ५००, एल्युगा रे ७०० आणि एल्युगा आय ४ हे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यानंतर आता पॅनासोनिक पी ९९ हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. वर नमूद केलेल्या मॉडेलप्रमाणे पी ९९ हे मॉडेलदेखील किफायतशीर दरातील आहे.
पॅनासोनिक पी ९९ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच ७२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्या या स्मार्टफोनची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून या प्रणालीत असणार्या गुगल असिस्टंट, स्प्लीट स्क्रीन आणि मल्टी-टास्कींग या फिचर्सचा लाभ युजरला मिळणार आहे. तर हे मॉडेल शॅम्पेन गोल्ड, ब्लॅक आणि ब्ल्यू या तीन आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.
पॅनासोनिक पी ९९ या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस प्रणालींसह ८ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. या दोन्ही कॅमेर्यांमध्ये ब्युटी मोड, बर्स्ट शॉट मोड, लो-लाईटसाठी नाईट मोड, मॅन्युअल कंट्रोलसाठी प्रो-मोड, वॉटरमार्क, एचडीआर आणि पॅनोरामा मोड आदी महत्वाचे फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. मात्र यात फिंगरप्रिंट स्कॅनर नसेल. पॅनासोनिक पी ९९ हे मॉडेल देशभरातील मोबाईल शॉपीजमधून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.