मायक्रोसॉफ्टने त्यांची नवीन ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज 10 मध्ये भारतीय भाषा टाईप करण्यासाठी इंडिक कीबोर्डचा समावेश केला आहे. याव्दारे हिंदी, बंगाली, गुजराती अशा दहा भारतीय भाषांमध्ये टाईप करता येणार आहे.
मायक्रोसॉफ्टने नुकतीच १० भारतीय भाषांसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड सादर केल्याची घोषणा केली. हा व्हर्च्युअल कीबोर्डमध्ये युजरची व्यवहारपद्धती नोंद केली जाणार आहे. त्यानुसार युजर लॅटीन भाषेमध्ये त्याची स्थानिक भाषा टाईप करत असेल तर त्या शब्दाचे स्थानिक भाषेमध्ये रुपांतर होणार आहे.
हा कीबोर्ड वापरल्यास अपेक्षित शब्द किंवा त्यानुसार सूचना मिळणार आहे. मोबाईलमध्ये गुगलचा कीबोर्डवर टाईप केल्यानंतर मराठी किंवा हिंदी भाषेमध्ये जसे रुपांतर होते, तसेच रुपांतर या किबोर्डमध्ये होणार आहे. तसेच एखाद्या अनोळखी भाषेमध्ये लिहायचे असल्यासही हा कीबोर्ड त्या भाषेमध्ये भाषांतर करणार आहे. यामुळे ही भाषा स्वतंत्रपणे शिकण्याची आवश्यकता भासणार नाही. अद्ययावत फोनेटिक कीबोर्ड हिंदी, बंगाली, तमिळ, मराठी, पंजाबी, गुजराती, उडिया, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या कीबोर्डवरून भारतीय आता त्यांच्या मातृभाषेमध्ये काम करू शकतात.
जर आपण लॅटिन अक्षरांमध्ये ‘Bharat’ टाईप केले तर फोनेटिक कीबोर्डचा अंतिम आउटपुट भारत (हिंदी), ভারত (बंगाली), ભારત (गुजराती) अथवा ਭਾਰਤ (पंजाबी) असणार आहे.
इंडिक फोनेटिक कीबोर्ड साठी काय कराल? विंडोज 10 (19एच1) च्या नवीन अपडेटमध्ये अद्ययावत कीबोर्ड स्वयंचलितपणे उपलब्ध आहेत. परंतु ज्या वापरकर्त्यांनी त्यांचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केले नाही ते साध्या स्टेप्समध्ये नवीन अपडेट मिळवू शकतात. Go to Settings> Updates & Security> Windows Update. अपडेट इन्स्टॉल झाल्यानंतर लँग्वेज सेटिंग्जमध्ये जाऊन फोनेटिक कीबोर्डस अॅक्टिव्हेट केले जाऊ शकतात.