POCO M3 Phone Blast: स्मार्टफोनमध्ये स्फोट होऊन आग लागल्याच्या घटना अधून मधून समोर येत असतात. त्या प्रत्येक बातमीनंतर स्मार्टफोन युजर्सची भीती वाढत जाते. गेले काही महिने OnePlus Nord 2 मधील स्फोटांच्या बातम्या येत होत्या. तर आता शाओमी सब-ब्रँड पोकोच्या बजेट फ्रेंडली POCO M3 च्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. एका ट्विटर युजरनं या दुर्घटनेची माहिती दिली फोटो पोस्ट करून दिली आहे.
ट्विटर युजर महेशनं त्याच्या भावाच्या फोनमध्ये आग लागल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. या स्फोटात Poco M3 चा बॅक पॅनल पूर्णपणे जळाल्याचे दिसत आहे. या स्फोटाचे कारण किंवा स्फोट कसा झाला, हे मात्र युजरनं सांगितलं नाही. POCO नं कंपनी या घटनेचा तपास करत असल्याचं सांगितलं आहे आणि तपास पूर्ण झाल्यावर कंपनी यावर विधान करेल, असं सांगण्यात आलं आहे. ट्विटर युजर महेशनं (@Mahesh08716488) मात्र आपली पोस्ट डिलीट केली आहे.
याआधी देखील सप्टेंबर 2021 मध्ये POCO X3 Pro च्या बॅक पॅनलमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हा युजरनं कंपनीकडून नुकसान भरपाई मागितली होती. एखाद्या स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये स्फोट होण्यामागे अनेक कारणं असतात. परंतु अनेक क्वॉलिटी टेस्टिंगमधून जाणाऱ्या स्मार्टफोनचा स्फोट झाल्यावर. कंपन्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न उभे राहणे साहजिक आहे.