सध्या दैनंदिन आयुष्यात स्मार्टफोन खूप गरजेचा बनला आहे. सर्वात जास्त काळ आपल्या शरीराच्या जवळ राहणारा हा डिवाइस आहे. त्यामुळे जेव्हा स्मार्टफोन ब्लास्टची बातमी येते तेव्हा काळजी वाढते. आज Poco चा स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याची बातमी आली आहे. हिमाचल प्रदेशमधील एका पोको युजरने ट्विटरवरून आपला दोन महिने जुना Poco X3 Pro स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याचे सांगितले आहे. युजरने कंपनीकडे स्मार्टफोन बदलून देण्याची मागणी केली आहे.
हिमाचल प्रदेशमधील एक ट्विटर युजर अमन भारद्वाजने आज आपल्या ट्विटर अकॉउंटवरून ट्विट करून Poco X3 Pro फोन ब्लास्ट झाल्याची माहिती दिली आहे. ट्विटनुसार हा फोन त्याने 2 महिन्यांपूर्वी घेतला होता. आज हा फोन चार्जिंगवरून काढल्यावर ब्लास्ट झाला. अमनने कंपनीकडे फोन बदलून देण्याची मागणी केली आहे. तसेच नवीन फोन न मिळाल्यास कंपनीच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. ट्विट सोबत असलेल्या फोटोमधून या ब्लास्टचे गांभीर्य दिसून येते.
अमन हिमाचल प्रदेशमधील रहिवाशी आहे, त्याने धिमन इलेक्ट्रॉनिक्स वर्क्स अँड मोबाईल मधून दोन महिन्यांपूर्वी Poco X3 Pro फोन विकत घेतला होता. आज फोन 100 चार्ज झाल्यावर त्याने काढला आणि तो बथरूममध्ये गेला. या 5-7 मिनिटांच्या काळात फोनला आग लागली होती आणि त्याची बेडशीट देखील जळाली होती. अमनने फोन जमिनीवर फेकला आणि पाणी टाकून आग विझवली, अशी माहिती अमनने 91मोबाईल्सला दिली आहे. आता त्याने आपला फोन सर्व्हिस सेंटरमध्ये दिला आहे, परंतु फोन बदलून मिळेल कि नाही याविषयी कोणतेही आश्वासन मिळाले नाही. याविषयी पोकोकडून देखील कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.