पोरट्रॉनिक्स कंपनीने भारतीय बाजारपेठेत हार्मोनिक्स २०० हा नेकबँड इयरफोन उतारण्याची घोषणा केली आहे. अलीकडच्या काळात नेकबँड या प्रकारातील इयरफोन्सचे मॉडेल लोकप्रिय होऊ लागले आहेत. यात स्टाईट आणि युटिलीटी या दोन्ही घटकांचा मिलाफ असल्यामुळे ग्राहकांची याला पसंती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोरट्रॉनिक्स या भारतीय कंपनीने आपले हार्मोनिक्स २०० हे मॉडेलदेखील याच प्रकारात उपलब्ध केले आहे. याचे मूल्य २,९९० रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे.
इयरफोन्सला नेकबँड संलग्न करण्यात आलेला आहे. हा नेकबँड अतिशय आकर्षक रंगाचा आणि स्टायलीश लूक असणारा आहे. यामध्ये सीएसआर ही चीपसेट देण्यात आलेली आहे. तर यामध्ये सीव्हीसी बॅकग्राऊंड नॉइस रिडक्शन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे युजरला बाहेरच्या आवाजाचा फारसा त्रास होत नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे. अर्थात यामुळे अतिशय स्पष्ट ध्वनीचा आनंद घेता येतो.
हार्मोनिक्स २०० या मॉडेलमध्ये ब्ल्यु-टुथ ४.१ कनेक्टीव्हिटीचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. याच्या मदतीने हे मॉडेल स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येते. सुमारे १० मीटर अंतरापर्यंत याची रेंज असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींचा सपोर्ट प्रदान करण्यात आलेला आहे. याच्याशी संलग्न असणार्या स्मार्टफोनवरील कॉल यावर ऐकता येतात. तसेच यावरून कॉल करण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. याला इन-लाईन कंट्रोल प्रणाली दिलेली आहे. याच्या मदतीने म्युझिक ट्रॅकला पुढे-मागे व पॉज करण्यासह ध्वनी कमी-जास्त करण्याची सुविधा यामुळे ग्राहकांना मिळाली आहे.
अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आलेली आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर १८ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर एकदा चार्ज केल्यानंतर ही बॅटरी तब्बल ३०० दिवसांचा स्टँडबाय टाईम देत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या इयरफोन्सवर हायड्रोफोबीक नॅनो कोटींग दिलेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे मॉडेल आयपीएक्स५ या निकषानुसार उत्पादीत करण्यात आले आहे. यामुळे यावर घामाचा कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे.