एकेकाळी मोबाईल क्षेत्रात अधिराज्य गाजविणाऱ्या नोकिया कंपनीला दुसऱ्यांदा बाजारात उतरूनही पाय घट्ट रोवता आलेले नाहीत. अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टिमला नकार देत विंडोजला स्वीकारल्याने डब्यात गेलेल्या नोकियाने पुन्हा नव्या दमाने अँड्रॉईडचे मोबाईल बाजारात आणले खरे, मात्र या मोबाईलची विक्रीने काही वेग घेतलेला नाही. यामुळे कंपनीला नुकत्याच लाँच केलेल्या मोबाईलच्या किंमतीही हजार, दीड हजारांनी कमी कराव्या लागल्या आहेत. तर प्रिमिअम स्मार्टफोनच्या किंमती 13 हजाराने कमी केल्या आहेत.
HMD ग्लोबलने Nokia 3.1 या मोबाईलची किंमत 11999 रुपयांवरून 10999 रुपये केली आहे. हा फोन यंदाच भारतात लाँच केला होता. तर Nokia 5.1 या मोबाईलची किंमत 1500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. Nokia 6.1 च्या किंमतीतही व्हेरिएंटनुसार 1000 ते 1500 रुपयांची घट करण्यात आली आहे. या फोनची किंमत 3GB/ 32GB 13,499 रुपये आणि 4GB/ 64GB ची 16,499 रुपये किंमत झाली आहे.
Nokia 6 (2018) ला एप्रिलमध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. 3 जीबी रॅमच्या व्हेरिअंटची किंमत 16999 रुपये तर 4 जीबी रॅमच्या व्हेरिअंटची किंमत 18999 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र चार महिन्यांतच 1500 रुपयांनी किंमत उतरविण्यात आली.
यानंतर कंपनीने फ्लॅगशिप फोन Nokia 8 Sirocco च्या किंमतीत मोठी घट केली आहे. हा फोनही एप्रिलमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. लाँचिंगवेळी या फोनची किंमत 49999 रुपये होती. आता 13000 रुपयांनी किंमत उतरल्याने 36999 रुपयांत हा फोन उपलब्ध झाला आहे.