नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत 5G मोबाईल सेवेची सुरुवात केली. यावेळी पीएम मोदींनी दिल्लीतून युरोपमध्ये कार चालवली. 5G मुळे हे शक्य झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते 5G मोबाईल सेवा तंत्रज्ञानाचे उद्घाटन झाले. 5G तंत्रज्ञानाचा वापर करुन पंतप्रधान मोदींनी इंडिया मोबाईल कॉन्फरन्समध्ये एरिक्सन बूथवर कार चालवली तर ही कार स्वीडनमध्ये पार्क केली होती.
या संदर्भातील ट्विट केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. रिमोटवर नियंत्रित होणारी कार यात दिसत आहे. ''पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारताच्या 5G तंत्रज्ञानाचा वापर करून दिल्लीपासून दूर युरोपमध्ये कार चालवण्याची चाचणी घेतात.'' अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
इंडिया मोबाईल काँग्रेस २०२२ आशियातील सर्वात मोठ्या डिजिटल प्लॅटफॉम मधील एक आहे. आजपासून सुरू झालेले हे पर्व दिल्लीच्या प्रगती मैदानावर ४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. येथे बसून युरोपमध्ये कार चालवण्याव्यतिरिक्त, मोदींनी कार्यक्रमात प्रदर्शित केलेल्या इतर अनेक तांत्रिक नवकल्पनांचाही अनुभव घेतला.
या कार्यक्रमात रिलायन्स जिओच्या स्टॉलवर पंतप्रधान मोदींना रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी तंत्रज्ञानाची माहिती दिली. यानंतर मोदी व्होडाफोन, आयडिया, एअरटेल, सी-डॉट या कंपन्यांच्या स्टॉलवर जाऊन माहिती घेतली. 5G तंत्रज्ञान सुरूवातीला १३ शहरांमध्ये सुरू होणार आहे. यानंतर २०२४ पर्यंत पूर्ण देशात सुरू होणार आहे.त्यामुळे इंटरनेटचे स्पीड डबल होणार आहे.