गेल्या काही वर्षांपासून मोबाईल फोन ऑनलाईन विकण्याचा आणि खरेदी करण्याचा ट्रेंड आला आहे. यामुळे शाओमी, अॅपल, सॅमसंग, ओप्पो सारख्या कंपन्याही फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर आपले फोन विक्री करत आहेत. यावेळी मोठा डिस्काऊंटही दिल्याचे दाखवले जाते. मात्र, तसे काही असते का, किती किंमत दाखवली जाते, खरी किंमत किती आणि डिस्काऊंट किती याची शहानिशा न केल्यास नंतर हुरहुर लागून राहते.
ई-कॉमर्स वेबसाईटवर सध्या एक्सचेंज ऑफर, बँकांच्या क्रेडीट-डेबिट कार्डवर कॅशबॅक आणि इएमआय सारख्या ऑफर दिल्या जातात. परंतू, आपल्याला जो फोन दाखवला जातोय त्याच्यावर डिस्काऊंट खरेच असतो का? उत्तर नाही. मोबाईल फोन लाँच केला जातो तेव्हा एमआरपी (सर्वाधिक विक्री मुल्य) वर विक्री केली जाते. मात्र, काही दिवस उलटताच मोबाईल कंपन्यांमधील स्पर्धेमुळे आणि नवनवीन तंत्रज्ञान बाजारात आणण्यासाठी त्या किंमतीच्या श्रेणीमध्ये नवे मोबाईल उतरविले जातात. यामुळे आधीच्या मोबाईलची किंमत कंपनी कमी करते. यातील फरक या ई-कॉमर्स कंपन्या डिस्काऊंट म्हणून दाखवतात.
मोबाईल कंपनीची ई-कॉमर्स वेबसाईटसोबत सामंज्यस्य झाले नसेल तर त्या वेबसाईटवर मोबाईलची किंमत सामंजस्य झालेल्या कंपनीपेक्षा जास्त असू शकते. यामुळे अन्य वेबसाईटवर या किंमती तपासून पहाव्यात.
बऱ्याचदा मोबाईल कंपन्या बँका आणि ई-कॉमर्स कंपन्यांसोबत सामंजस्य करार करतात. यानुसार कॅशबॅक, इएमआयसारख्या स्कीमही असतात. यामुळे सर्व ई-कॉमर्स वेबसाईटवर कोणती बँक काय ऑफर पुरवत आहे ते तपासावे. अन्यथा मोबाईल जास्त किंमतीला पडू शकतो.
रिफर्बिश्ड फोनही या ई-कॉमर्स कंपन्या विकतात. बऱ्याचदा आपण किंमत पाहून खरेदी करतो. मात्र, नंतर तो वापरलेला मोबाईल असल्याचे समजते. यामुळे खरेदीपूर्वी तपासावे. तसेच रिफर्बिश्ड फोन घेण्यापेक्षा नव्या फोनकडे वळावे. कारण किंमतीतही फारसा फरक नसतो. तसेच वॉरंटीही कमी मिळते.
एक्सचेंज ऑफरही बऱ्याचदा आपल्याला चांगली किंमत देत नाहीत. मात्र, लाँचिंग किंवा बंपर सेल असेल तर ई-कॉमर्स कंपन्या या मुळ एक्सचेंज किंमतीपेक्षा जादा किंमत देतात. यावेळी मोबाईल एक्सचेंज करणे फायद्याचे ठरते.
ऑनलाईन खरेदीवेळी मोबाईल न आवडल्यास परत देण्याची तरतूद असते. मात्र, याबाबतची माहिती आधी वाचून घ्यावी. वापरलेला असल्यास कंपन्या मोबाईल मागे घेत नाहीत. सुरुवातीच्या काळात ऑनलाईन खरेदी लोकप्रिय होण्यासाठी वापरलेल्या वस्तूही मुदतीत परत केल्यास परत घेतल्या जात होत्या.
ऑनलाईन खरेदीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, या मोबाईल किंवा वस्तूंबाबत आधी वापरणाऱ्या लोकांनी रिव्ह्यू टाकलेले असतात. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण फसण्यापासून वाचू शकतो.