सुपरफास्ट 5G इंटरनेटचे स्वप्न पाहणाऱ्या तंत्रज्ञान प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्वालकॉमने नुकताच स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर लाँच केला असून सर्वात आधी अमेरिकेमध्ये हे तंत्रज्ञान देण्यात येणार आहे. तसेच यानंतर आशिया आणि युरोपमध्ये 5G सेवा पुरवठादार तयार झाल्यानंतर या प्रोसेसरचे स्मार्टफोन आणले जाणार आहेत. 5G हे सध्याच्या 4 जी पेक्षा 50 ते 100 पटींनी जास्त वेगवान असणार आहे.
क्वालकॉमने यंदाच्या मोबाईल काँग्रेसमध्ये 5G साठी प्रोसेसर आणण्याची घोषणा केली होती. तसेच हा प्रोसेसर पुढील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये उपलब्ध करण्याचे सांगितले होते. यावेळी मोबाईल निर्मात्या कंपन्यांनीही यास संमती दिली होती. मंगळवारी हवाई येथील एका कार्यक्रमात क्वालकॉमने स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर लाँच केला. या प्रोसेसरमध्ये X50 हे मोडेम असणार आहे.
क्वालकॉमचा हा अद्ययावर प्रोसेसर व्हेरिझोन कम्युनुकेशनच्या मदतीने सॅमसंग 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन अमेरिकेत 2019 च्या मध्यापर्यंत उपलब्ध होतील. सॅमसंग ही कंपनी अॅपलला अमेरिकेमध्ये कडवी टक्कर देत असून 5G च्या स्पर्धेत बाजी मारल्यास अॅपलला चांगलेच जड जाणार आहे. अॅपलला 5G असणाऱ्या आयफोनसाठी 2020 पर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. तसेच सॅमसंगनंतर वनप्लस ही प्रिमिअम बजेट स्मार्टफोन बनविणारी कंपनीही 5G चे फोन आणण्याची शक्यता आहे.