रेल्वे मंत्रालयाने आपले बहुप्रतिक्षित रेल सारथी हे अॅप भारतीय प्रवाशांसाठी सादर केले असून यात विविध सुविधांचा समावेश आहे.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवाशांसाठी ‘ऑल इन वन’ या प्रकारातील रेल्वे अॅप लाँच करणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. यात विविधांगी सुविधांचा समावेश असेल असे जाहीर करण्यात आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमिवर सुरेश प्रभू यांनी रेल सारथी अॅपचे (hyperlink :https://play.google.com/store/apps/details?id=com.cris.ima.coms&hl=en ) लोकार्पण केले. वास्तविक पाहता रेल्वे मंत्रालयातर्फे आधीपासूनच अनेक अॅप लाँच करण्यात आले आहेत. अर्थात यात प्रत्येक सेवेसाठी स्वतंत्र अॅप इन्टॉल करून वापरावे लागत होते. मात्र रेल सारथी अॅपमध्ये रेल्वेच्या सर्व सेवांचा समावेश करण्यात आला असल्याने अन्य दुसरे कोणतेही अॅप वापरण्याची गरज उरणार नाही. यात विविध प्रकारच्या इनक्वायरीज, तिकिट बुकींग, प्रवासातील स्वच्छता/साफसफाईसह अन्य सुविधा तसेच खाद्य पदार्थांच्या ऑर्डरचा समावेश आहे. विशेष म्हणजे या अॅपवरून रेल्वेचेच नव्हे तर चक्क हवाई प्रवासाचे तिकिटही बुक करता येईल. तसेच यात महिला सुरक्षा, तक्रारी, सूचना आदींची सुविधाही असेल.