सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी रोज नवनवीन शक्कल लढवत आहेत. आता तर आधार कार्ड नंबर आणि फिंगर प्रिंट वापरून लोकांच्या पैशावर डल्ला मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार नवीन युक्त्या वापरून बँक ग्राहकांच्या फिंगर प्रिंट्सचा वापर करून बँक अकाउंटमधले पैसे संबंधित ग्राहकाच्या ऑथेंटिकेशनशिवाय काढून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायबर गुन्हेगार फिंगर प्रिंट क्लोन करून बँक अकाउंटमधून पैसे चोरत आहेत.
आधी थर्मल स्कॅनर, इमेज बूस्टर अशा अनेक ठिकाणांवरून फिंगरप्रिंट्स घेतले जायचे; पण आता प्लास्टिक चिकटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ग्लू गन’च्या साह्यानेसुद्धा फिंगर प्रिंट्सचं क्लोनिंग केलं जात आहे. बँक अकाऊंटचा वापर करताना तुम्ही तुमचा पिन आणि पासवर्ड बदलू शकता; पण तुमचा फिंगरप्रिंट कधीही बदलू शकत नाही. आता तर या फिंगर प्रिंटचाच वापर सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी करीत आहेत. याबाबत सायबर एक्सपर्ट राहुल यांनी तुमचे फिंगर प्रिंट कुठेही वापरणं टाळा आणि शक्यतो तुमचा आधार कार्ड नंबर देणं टाळा असं म्हटलं आहे.
फिंगर प्रिंट वापरून ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकार रांचीमध्ये मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अनेकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब होत आहेत. अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची शिकार ठरणाऱ्या व्यक्तींमध्ये बिल्डर, जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या व्यक्ती, कंत्राटदार आदींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. रांची सायबर सेलमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अनेक गुन्हे अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे आहेत, ज्यांचे पैसे ग्राहक सेवा केंद्र किंवा सुविधा केंद्राद्वारे काढले गेलेत.
रांची पोलीस सध्या या प्रकरणांचा तपास करण्यात गुंतले आहेत. याबाबत रांचीचे एसएसपी किशोर कौशल म्हणाले, की सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले असून लवकरच अशा प्रकरणांचा पर्दाफाश केला जाईल.दरम्यान, सायबर गुन्हेगारांचे हे डावपेच टाळण्यासाठी, प्रत्येकाने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा कोणीही या गुन्हेगारांचे शिकार बनू शकतात. त्यामुळे योग्य खबरदारी घेणं केव्हाही फायद्याचे ठरतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.