गेल्या आठवड्यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट लाँच झाला. त्यानंतर स्मार्टफोन कंपन्यांमध्ये नवी शर्यत सुरु झाली, अनेक कंपन्यांनी हा प्रोसेसर असेलेल्या आपल्या फ्लॅगशिप डिवाइसची घोषणा केली. आता रियलमीचा पहिला प्रीमियम फ्लॅगशिप Realme GT 2 Pro देखील या चिपसेटसह येईल आणि आता कंपनीनं या स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे.
Realme GT 2 Pro चीनमध्ये 9 डिसेंबरला सादर केला जाईल, अशी माहिती कंपनीनं सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. या पोस्टमध्ये या आगामी शक्तिशाली चिपसेट प्रोसेसरसह येणाऱ्या डिवाइसच्या काही फीचर्सची देखील माहिती दिली आहे.
9 तारखेला हा स्मार्टफोन लाँच होईल कि फक्त घोषणा केली जाईल हे स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे त्याचदिवशी मोटोरोला देखील आपला Moto Edge X30 स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर करणार आहे. त्यामुळे रियलमीची ही घोषणा मोटोरोलाला टक्कर देण्यासाठी करण्यात आल्याचा अंदाज लावला जात आहे.
Realme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Realme GT 2 Pro स्मार्टफोनमध्ये 125W फास्ट चार्जिंग मिळेल. तसेच या फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. काही दिवसांपूर्वी या फोनचे रेंडर समोर आले होते. या रेंडर्सनुसार या फोनच्या बॅक पॅनलवर हॉरीझॉन्टल कॅमेरा सेटअप देण्यात येईल. या फोनचे संपूर्ण स्पेक्स 9 डिसेंबरला समोर येतील, अशी अपेक्षा आहे.