Realme Narzo 50A Blast: दिवसेंदिवस स्मार्टफोन ब्लास्ट होण्याच्या घटना वाढत आहेत. आता Realme Narzo 50A मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. ग्राहकाच्या बॅगेत असताना या स्मार्टफोननं अचानक पेट घेतला. विशेष म्हणजे हा डिवाइस ग्राहकाने फक्त तीन दिवसांपूर्वी विकत घेतला होता. इंडोनेशियामधील ही बातमी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रियलमीच्या फोनमध्ये स्फोट
@Jack_oliverz नावाच्या एका इंडोनेशियन ग्राहकाने ट्विटरच्या माध्यमातून हा प्रसंग जगासमोर ठेवला आहे. ट्विटमध्ये जॅकनं कंपनीच्या अधिकृत इंडोनेशियन हॅन्डलला टॅग केलं आहे. त्याने लिहलं आहे की, “मी रियलमी ब्रँडचा फोन विकत घेण्याची ही माझी पहिली वेळ आहे. फक्त 3 दिवस हा डिवाइस मी वापरला आहे आणि हा बॅगेत ब्लास्ट झाला आहे. मी याची तक्रार देखील केली आहे परंतु माझीच चुकी असल्याचं कंपनी म्हणत आहे.”
या ट्विट सोबत युजरनं स्फोट झालेल्या Realme Narzo 50A चा फोटो देखील जोडला आहे, ज्यात फोनचा नवा कोरा बॉक्स देखील दिसत आहे. डिवाइसचा वरचा भाग जळाला आहे, तसेच ही आग कॅमेरा मॉड्यूल पर्यंत पोहोचल्याचं देखील दिसत आहे. युजरने पुन्हा रियलमी फोन्स विकत न घेण्याचा विचार व्यक्त केला आहे. तो ट्विटमध्ये म्हणाला आहे की, “त्याच्या बॅगमध्ये इतर कोणतीही धोकादायक वस्तू नव्हती, ज्यामुळे आग लागू शकते. मी पुन्हा हा ब्रँड विकत घेणार नाही.”
रियलमी इंडोनेशियाकडून या घटनेबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. Realme Narzo 50A स्मार्टफोन गेल्यावर्षी भारतात लाँच झाला आहे. यातील 6000mAh ची अवाढव्य बॅटरी याची खासियत म्हणता येईल.