भारतात कमी काळात लोकप्रिय झालेली चीनची कंपनी शाओमीने नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 7 हा सर्वात दणकट फोन असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी या फोनवर एक अनोखा प्रयोग केला आहे. तब्बल 31 हजार मीटर अंतराळात हा फोन पाठविण्यात आला होता. एवढ्या उंचीवरून या फोनने पृथ्वीचे फोटोही काढले. जेव्हा या फोनला घेऊन जाणारा बलून फुटला तेव्हा हा फोन प्रचंड वेगात खाली आला. पुढे काय झाले असेल विचार न केलेला बरा...
शाओमीने या प्रयोगाचा व्हीडिओ तयार केला आहे. हा व्हीडिओ कंपनीचे सीईओ ली जून यांनीही शेअर केला आहे.
रेडमीच्या या फोनला बलून बांधण्यात आला होता. हा बलून अंतराळात सोडण्यात आला. कंपनीने या फोनला तब्बल 31 हजार मीटर म्हणजेच 1,01,706 फूट उंचीवर नेण्यात आले होते. कंपनीने एवढ्या उंचीवर या फोनद्वारे पृथ्वीचे काही फोटोही काढले. हा जगातील पहिला फोन आहे ज्यावर अशा प्रकारे टेस्ट करण्यात आल्या. या फोनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे. ही टेस्ट यशस्वी झाल्यानंतर हा व्हीडिओ जून यांनी शेअर करत 'लिटिल किंग कोंग' असे नाव दिले.
जेव्हा हा बलून 35,375 मीटरवर होता तेव्हा बलून फुटला. या टेस्टवेळी रेडमी नोट 7 चे आतील तापमान 9 डिग्री सेल्सिअस आणि बाहेर -56 डिग्री सेल्सिअस तापमान होते. बलून फुटला तरीही फोनने हे तापमान सहन केले. या फोनची किंमत 11, 999 रुपये आहे.
हा फोन जेव्हा खाली पडला तेव्हा त्याला काहीही झालेले नव्हते. एवढ्या उंचीवरून हा फोन वेगात खाली येऊनही स्क्रीनला तडाही गेलेला नाही. यामुळे एवढ्या उंचीवरील हवेचा दबाव, कमी तापमान आणि खाली पडण्यामुळे काहीही न झाल्याने कंपनीने हा फोन सर्वात दणकट असल्याचा दावा केला आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे.