शाओमीच्या सब ब्रँड रेडमीची नोट सीरिज खूप लोकप्रिय आहे. अनेकजण कित्येक वर्ष हे डिवाइस वापरत आहेत. या लोकप्रियेतचा फायदा घेण्याचा प्रयत्न कंपनी एकाच वर्षात दोन नोट लाईनअप सादर करून करते. यंदा Redmi Note 11 Series काही महिन्यांपूर्वी जागतिक बाजारात आली असताना आता कंपनीची आगामी सीरिज टीज करण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ लू विबिंग यांनी Redmi Note 12 Series चीनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वरून टीज केली आहे.
वर्षातून दोनदा रेडमी नोट सीरीज
पोस्ट केलेल्या टीजर फोटोमध्ये लू यांनी आगामी सीरीजबाबत एक प्रश्न विचारला आहे. Redmi CEO नी टीजर फोटोच्या पोस्टमध्ये आगामी रेडमी नोट सीरीजचं तुम्ही काय नाव ठेवणार असा प्रश्न युजर्सना केला आहे. Weibo पोस्टमध्ये Lu Weibing यांनी 2021 मध्ये कंपनीनं घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यानुसार, दरवर्षी दोन रेडमी सीरीजचे फोन सादर केले जातील. गेल्यावर्षी शाओमीनं 2021 च्या पूर्वार्धात Redmi Note 10 सीरीज सादर केली होती. तर रेडमी नोट 11 सीरीज उत्तरार्धात ग्राहकांच्या भेटीला आली होती.
Redmi Note 10 सीरीज परफॉर्मन्स सेंट्रिक होती, तर रेडमी नोट 11 सीरीजमध्ये कॅमेऱ्यावर भर देण्यात आला होता. आता Redmi Note 12 सीरीजमध्ये पुन्हा एकदा कंपनी परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करू शकते. तर Redmi Note 13 सीरीजमधील कॅमेरा शानदार असू शकतो.
रिपोर्टनुसार , Redmi Note 12 सीरीजमध्ये Redmi Note 12 व्यतिरिक्त Redmi Note 12X आणि Redmi Note 12T फोन सादर केले जाऊ शकतात. ही सीरीज मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लाँच होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेडमी 12 सीरीजमध्ये आधीच्या तुलनेत अपग्रेडेड स्पेक्स देण्यात येतील. आगामी सीरीजच्या परफॉर्मन्समध्ये आमूलाग्र बदल दिसू शकतो. परंतु सध्या तरी फक्त ही सीरिज टीज करण्यात आली आहे, जोपर्यंत स्पेक्सची माहिती समोर येत नाही तोपर्यंत काहीही बोलणं घाईचं ठरेल.