नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत देशात सर्वत्र 4G ऐवजी 5G वापरण्यास सुरुवात होणार आहे. रिलायन्स जिओने देशातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली असून आता या यादीत 11 नवीन शहरांचाही समावेश झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ तसेच चंदीगडमधील शहरांचा समावेश आहे.
रिलायन्स जिओने दिलेल्या माहितीनुसार, ज्या 11 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लखनौ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद आणि चंदीगडचा समावेश आहे. याचबरोबर मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सी येथेही 5 जी सेवा सुरू करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात 5G सेवा अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी लाँच करण्यात आली आहे.
Jio Welcome Offer मिळणारपीटीआयच्या वृत्तानुसार, या सर्व शहरांमध्ये जिओच्या 5 जी सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर (Jio Welcome Offer) मिळणार आहे. या ऑफर अंतर्गत, सर्व ग्राहक 1 Gbps पर्यंत हायस्पीडने अनलिमिटेड डेटाचा आनंद घेऊ शकतील. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व शहरे देशातील प्रमुख पर्यटन स्थळे आणि शैक्षणिक केंद्र आहेत. अशा परिस्थितीत पर्यटक आणि विद्यार्थ्यांना हायस्पीड 5G सेवेचा लाभ मिळणार आहे.
गुजरात बनले पहिले 5G राज्यया शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यापूर्वी रिलायन्स जिओने गुजरातमधील सर्व जिल्ह्यांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. कंपनीने आपली 5G सेवा राज्यातील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये विस्तारित केली आहे. अशाप्रकारे 100 टक्के 5G सेवा मिळवणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
'एज्युकेशन फॉर ऑल'सोबत सेवा लाँचगुजरातमधील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये 100 टक्के 5G सेवा सुरू करताना, कंपनीने सांगितले होते की, ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 5G सेवा प्रदान करण्यात येईल. यासोबतच कंपनीने आपला 'एज्युकेशन फॉर ऑल' हा उपक्रमही राज्यात सुरू केला. याअंतर्गत रिलायन्स फाऊंडेशन आणि जिओ मिळून गुजरातमधील 100 शाळा डिजिटल करणार आहेत.