सर्वाधिक स्मार्टफोन विकण्याच्या आणि वापरण्याच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारतातील स्मार्टफोन मार्केट अत्यंत मोठे आहे. यामुळे येथे अनेक परदेशी कंपन्या गुंतवणूक करत आहेत. आता याच शर्यतीत जिओ देखील 5 जी फोन लॉन्च करण्याच्या तयारी दिसत आहे. असे झाल्यास तो स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालू शकतो आणि याचा मोठा फटका चीनला बसू शकतो.
क्वालकॉमसोबत पार्टनरशिप -etnownews ने दिलेल्या वृत्तानुसार, क्वालकॉमने (Qualcomm) भारतीय बाजारात आपला सर्वात स्वस्त 5G चिपसेट लॉन्च केला आहे. जो देशातील स्मार्टफोनमध्ये क्रांती घडवून आणेल. साधारणपणे 8200 रुपयांचा हँडसेट तयार करण्यास सक्षम बनवण्यासाठी, स्नॅपड्रॅगन 4s जेन 2 चिपसेट उपयोगी ठरेल. हे भारतीय ग्राहकांमध्ये 5G दूरवर पोहोचवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे.
यासाठी क्वालकॉमने रिलायन्स जिओसोबत पार्टनरशिप केली आहे. या कंपन्या 5जी स्मार्टफोन आणि इतर 5जी सोल्यूशन्स आणू शकतात. जे लोक 2जी यूज करत आहेत. त्यांना 5जी मध्ये अपग्रेड करणे हे यांचे लक्ष्य आहे.
या भागीदारीसंदर्भात बोलताना रिलायन्स जिओच्या डिव्हाइस डिव्हिजनचे हेड सुनील दत्त म्हणाले, ही भागीदारी भारतभरातील सामान्य नागरिकांपर्यंत 5G इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. क्वालकॉमचा मोबाईल फोन तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून प्रत्येकापर्यंत 5G सेवा पोहोचू शकेल. भारतात सर्वांनाच अगदी सहजपणे 5G इंटरनेट उपलब्ध होईल. महत्वाचे म्हणजे, जिओशिवाय, Xiaomi देखील स्वस्त 5G फोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे.