नवी दिल्ली : रिलायन्सजिओने गेल्या महिन्यात गिगा फायबर लाँच करून टेलिकॉम क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र, आता त्यातील खऱ्या बाबी बाहेर येऊ लागल्या आहेत. जिओने 699 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएसचा वेग दिला होता. याचबरोबर लँडलाईन कनेक्शनसह 4के टीव्हीही देणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता पुरती निराशा होणार आहे. मोफत टीव्ही मिळेल पण कनेक्शन मिळणार नाही.
जिओ 4 के सेट टॉप बॉक्स देणार आहे. मात्र, टीव्हीवर चॅनेल पाहण्यासाठी लोकल केबल ऑपरेटर किंवा अन्य केबल ऑपरेटरचे कनेक्शन घ्यावे लागणार आहे. यामुळे 699 सह केबलसाठीचे वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत. जिओ फायबर युजरसाठी सध्या हाथवे, डेन आणि जीपीटीएल हाथवे सारखे प्रोव्हायडर केबल सर्व्हिस देत आहेत. जर तुम्हाला 4 के सेट टॉप बॉक्सवर कन्टेट पहायचा असेल तर यांच्याकडून केबल टीव्ही कनेक्शन घ्यावे लागणार आहे.
जिओ फायबर नव्या ग्राहकांकडून 2500 रुपये डिपॉझिट घेत आहे. यापैकी 1 हजार रुपये इन्स्टॉलेशन चार्ज आहे, जो पत मिळणार नाही. 1500 रुपयांची रक्कम परत मिळणार आहे. जिओ फायबरच्या कनेक्शनसोबत ग्राहकाला सेट-टॉप बॉक्स मिळणार आहे.
आधी असे वाटले होते की कंपनी टीव्ही देत आहे तर कनेक्शन पण देणार. पण तसे नाहीय. रिलायन्स ग्राहकांसाठी IPTV (इंटरनेट प्रोटोकॉल टीव्ही) आणणार होती. मात्र, त्यात अपयश आले आहे. यामुळे कंपनीने हाथवे आणि डेन नेटवर्कमध्ये हिस्सा खरेदी केला आहे. तसेच IPTV ला स्थानिक केबल ऑपरेटराकडून विरोध होत होता. यामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प होणार होता.