रिलायन्स कंपनीने फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा एलवायएफ सी४५९ हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध केला आहे.
रिलायन्स कंपनीतर्फे काही दिवसांपुर्वीच इंडिया का स्मार्टफोन लाँच करून धमाल उडवून दिली आहे. १५०० रूपये अमानत रक्कम भरून कुणीही याला खरेदी करू शकेल. तीन वर्षानंतर हे पैसे परत मिळणार असल्याने ग्राहकाला हा फोन मोफत मिळणार आहे. यामुळे रिलायन्स फक्त या स्मार्टफोनला आक्रमकपणे प्रमोट करणार असल्याचे मानले जात होते. तथापि, एलवायएफ सी४५९ या मॉडेलच्या माध्यमातून रिलायन्स अन्य स्मार्टफोनबाबतही गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिलायन्स एलवायएफ सी४५९ या मॉडेलची कंपनीच्या वेबसाईटवर लिस्टींग झाली आहे. हा वाइंड या मालिकेतील स्मार्टफोन असून यात प्राथमिक स्वरूपाचे फिचर्स आहेत. यात ४.५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए (४८० बाय ८५४ पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असून यावर २-डी असाही ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. क्वालकॉमच्या १.३ गेगाहर्टझ स्नॅपड्रॅगन २१० एमएसएम८९०९ हा प्रोसेसर यात असेल. याची रॅम एक जीबी आणि अंतर्गत स्टोअरेज आठ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशच्या सुविधांनी युक्त असणारा यात ५ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा तर फ्लॅशयुक्त २ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेर्यात स्माईल डिटेक्शन, गेझ डिटेक्शन, ब्लिंक डिटेक्शन, पॅनोरामा, रेड आय डिटेक्शन, ऑटो फ्रेम रेट, कंटिन्युअस ऑटो-फोकस आदी महत्वाच्या सुविधा असतील. अँड्रॉइडच्या ६.१ मार्शमॅलो आवृत्तीवर चालणार्या या स्मार्टफोनमध्ये २,००० मिलीअँपिअर क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी प्रदान करण्यात आली असून याच्या मदतीने आठ तासांचा बॅकअप मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
रिलायन्स एलवायएफ सी४५९ हे मॉडेल ग्राहकांना ४,६९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आले आहे. यात फोर-जी व्हिओएलटीई व एलटीई नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यु-टुथ, मायक्रो-युएसबी आदी कनेक्टिव्हिटीचे पर्याय असतील. याशिवाय यात विविध सेन्सर्स प्रदान करण्यात आले असून यात प्रॉक्झीमिटी, अॅक्सलेरोमीटर, अँबियंट लाईट आदींचा समावेश असेल.