नवी दिल्ली : गुगल क्रोम (Google Chrome) हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे वेब ब्राउझर आहे. नवीन रिपोर्टनुसार, 2022 चा सर्वात असुरक्षित ब्राउझर गुगल क्रोम असल्याचे सांगण्यात येत आहे. अलटस व्हीपीएनच्या रिपोर्टनुसार, क्रोम ब्राउझरमध्ये आतापर्यंत एकूण 3,159 सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. ही आकडेवारी VulDB vulnerability डेटाबेसमधील डेटावर आधारित आहे, जी 1 जानेवारी 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे, असा दावा रिपोर्टमध्ये केला आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या पाच दिवसांत क्रोम ब्राउझरमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अलीकडे या ब्राउझरमध्ये CVE-2022-3318, CVE-2022-3314, CVE-2022-3311, CVE-2022-3309 आणि CVE-2022-3307 सुरक्षा त्रुटी आढळल्या. CVE प्रोग्राम अनेक प्लॅटफॉर्मवर सुरक्षा त्रुटी आणि कमतरता यांचा ट्रॅक करत असते. डेटाबेस अद्याप या त्रुटींबद्दल माहिती सूचीबद्ध करत नाही. पण या सुरक्षेतील त्रुटींमुळे कॅम्प्युटकरची मेमरी खराब होऊ शकते, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, युजर्स गुगल क्रोम व्हर्जन 106.0.5249.61 वर अपडेट करून ते ठिक करू शकतात. सुरक्षेच्या त्रुटींचा विचार केल्यास, गुगल क्रोमनंतर मोझिला फायरफॉक्स (Mozilla Firefox), मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge), अॅपल सफारी (Apple Safari) आणि ओपेरा (Opera) यांचा नंबर लागतो. मोझिलाचे फायरफॉक्स ब्राउझर असुरक्षिततेसाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
05 ऑक्टोबरपर्यंत, मायक्रोसॉफ्ट एजमध्ये 103 सुरक्षा त्रुटी आढळल्या होत्या, ज्या 2021 च्या पूर्ण वर्षाच्या तुलनेत 61 टक्के अधिक आहेत. रिलीज झाल्यापासून एकूण 806 सुरक्षा त्रुटी त्यात आढळून आल्या आहेत. यानंतर सफारी ब्राउझर आहे, ज्यामध्ये काही खालच्या स्तरावर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. तर ओपेरा ब्राउझरमध्ये 2022 मध्ये आतापर्यंत कोणतीच सुरक्षा त्रुटी आढळली नाही. मे 2022 पर्यंत सफारी ब्राउझरचा वापर एक अब्जहून अधिक युजर्सनी केला आहे.