मायक्रोसॉफ्ट कंपनीने अलीकडेच लिंक्डइनला खरेदी केले आहे. यामुळे या दोन्ही कंपन्या एकमेकांना पूरक असणार्या सुविधा देण्याची शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती. या अनुषंगाने आता मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये रिझ्युमे असिस्टंट देण्यात आला आहे. अर्थात यासाठी लिंक्डइनची मदत घेण्यात आली आहे. रिझ्युमे हा प्रोफेशनल विश्वातील सर्वात महत्वाचा घटक आहे. उत्तम दर्जाचा रिझ्युमे हा चांगली नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असतो. यामुळे आता कुणीही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर रिझ्युमे टाईप करत असेल तर त्याला लिंक्डइन साईटवरील रिझ्युमेंच्या असंख्य नमुन्यांमधून हवा तो निवडता येणार आहे. यात कुणीही आपल्याला हवा तो भागच निवडून आपल्या रिझ्युमेमध्ये वापरू शकेल. यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डच्या वरील भागात उजवीकडे ‘रिझ्युमे असिस्टंट’ या देण्यात आलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
मायक्रोसॉफ्ट वर्ड हा अतिशय उत्तम दर्जाचा वर्ड एडिटर असून याला लिंक्डइनमधील डाटाबेसची या माध्यमातून जोड देण्यात आली आहे. याला इंटर-कनेक्टीव्हिटीदेखील आहे. म्हणजे युजर ज्या पध्दतीने लिंक्डइनवरील रिझ्युमेंच्या नमुन्यातून हवा तो निवडू शकतो. याचसोबत त्याला आपल्या व्यवसायाशी संबंधीत लिंक्डइनवरील नोकर्यांच्या जाहिरातीसुध्दा तात्काळ दिसणार आहेत. अर्थात रिझ्युमे पूर्ण झाल्यावर तो वर्डमध्ये सेव्ह करता येणार आहे. तसेच याला आपल्या लिंक्डइन प्रोफाईलवर अपलोड करणे आणि याच्या सोबतीला रोजगाराच्या संधी शोधणे या बाबी यातून साध्य होणार आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रणालीस आर्टीफिशियल इंटिलेजियन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेची जोड देण्यात आली आहे. यामुळे संबंधीत युजरच्या व्यवसायाशी संबंधीत रिझ्युमे तसेच नोकरी सर्च करतांना अचूकता साधता येत असल्याचे मायक्रोसॉफ्टतर्फे नमूद करण्यात आले आहे.
‘ऑफीस ३६५‘च्या सबस्क्रीप्शनच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्या युजर्सला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये जगभरातील युजर्सला हे फिचर टप्प्याटप्प्याने प्रदान करण्यात येणार असल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
पहा: मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिझ्युमे असिस्टंटची माहिती दर्शविणारा व्हिडीओ.