फेसबुकने काही वर्षापूर्वी अधिग्रहीत केलेल्या ऑक्युलस कंपनीच्या माध्यमातून व्हिआर हेडसेट सादर केले आहेत. या मालिकेत ऑक्युलस गो हे नवीन मॉडेल उपलब्ध करण्यात आले आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात याची घोषणा करण्यात आली होती. आता ग्राहकांना हे मॉडेल प्रत्यक्षात खरेदी करता येणार आहे. जागतिक बाजारपेठेत याचे मूल्य १९९ डॉलर्स आहे. फेसबुकच्या एफ८ या वार्षिक परिषदेत या कंपनीचा संस्थापक तथा सीईओ मार्क झुकरबर्ग याने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
ऑक्युलस गो हा स्टँडअलोन व्हिआर हेडसेट आहे. अर्थात या मॉडेलमध्ये स्मार्टफोन अथवा संगणकावरील कनेक्टिव्हिटीचा आवश्यकता नाही. याऐवजी यात २५६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले इनबिल्ट स्वरूपात देण्यात आला आहे. याच्या सोबतीला यात इनबिल्ट ऑडिओ हेडफोनदेखील देण्यात आला आहे. याला अतिशय दर्जेदार अशा मोशन कंट्रोलरची जोड देण्यात आली आहे. तसेच याच्यासोबत टचपॅड आणि ट्रिगर देण्यात आले असून याच्या मदतीने सुलभपणे नेव्हिगेशन करता येणार आहे. या हेडसेटमध्ये ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज प्रदान करण्यात आले आहे. तसेच याचे ६४ जीबी स्टोअरेज असणारे मॉडेलदेखील सादर करण्यात आले असून याचे मूल्य २४९ डॉलर्स इतके असेल. तसेच यामध्ये स्वतंत्र स्पीकर आणि मायक्रोफोनदेखील देण्यात आला आहे. हा हेडसेट क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ८२१ या प्रोसेसरने सज्ज आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर गेमींगसाठी १.५ ते २ तर व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी २ ते २.५ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा हेडसेट लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होईल असे संकेत मिळाले आहेत.