इंग्लड : सध्या सोशल मीडिया हेसुध्दा कमवण्याचं साधन बनलंय. तुमच्या अंगी एखादी कला असेल तर तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करु शकता. कमी कालावधीत जगभरात पोहोचण्यासाठी युट्यूब हे सगळ्यात उत्तम माध्यम आहे. मध्यंतरी आपण जगातील सगळ्यात लहान श्रीमंत युट्यूबर पाहिला. आता जगातील सगळ्यात श्रीमंत तरुण युट्यूबरची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हा युट्यूबर व्हिडिओ गेम्सचे रिव्ह्यू देऊन पैसे कमवतो. फोर्ब मॅगझीनने जाहिर केलेल्या यादीनुसार हा तरुण जगातील सगळ्यात श्रीमंत युट्यूबर आहे.
दि सन या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लडमध्ये राहणारा २६ वर्षीय डॅन मिडल्टन हा व्हिडिओ गेम्सचे रिव्ह्यू देतो. डॅनटीएम या युट्यूब चॅनेलवर तो नियमित व्हिडिओ गेम्सचे रिव्ह्यू देतो. सध्या व्हिडिओ गेम्सना प्रचंड मागणी आहे. मुलांच्या या वृत्तीमुळे अनेक पालक नाराजही आहेत. पण या व्हिडिओ गेम खेळण्याच्या छंदामुळे डॅनने रिव्ह्यू द्यायला सुरुवात केली. बघता बघता त्याच्या रिव्ह्यूजना चांगली पसंती मिळत गेली. फोर्ब मॅगझिनने जाहिर केलेल्या यादीनुसार, २०१७ मध्ये सगळ्यात श्रीमंत युट्यूबर म्हणून याची गणना करण्यात आली आहे.
डॅनने पाच वर्षांपूर्वी हे चॅनेल सुरू केलं होतं. एक छंद म्हणूनच त्याने या सगळ्यांची सुरुवात केली होती. युट्यूब सुरू करण्याआधी त्याने इंग्लडच्या टेस्कोमध्ये काम केलंय. त्यानंतर त्याने युट्यूब चॅनेल सुरू केलं. यापासून त्याला कमाईही सुरू झाली आणि त्याचा हुरुप वाढत गेला. त्याचं चॅनेल १ कोटी लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. या युट्यूबच्या माध्यमातून तब्बल ८० ते ९० कोटींचं वार्षिक उत्पन्न त्याला मिळत असतं. अनेकांना तो आता आपला आदर्श वगैरे वाटु लागलाय. त्याच्याकडून प्रेरणा घेत अनेकांनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी यु-ट्युबची मदत घेण्याचं ठरवलंय. भारतातही तन्मय भट्ट, साहील खट्टर भुवन बाम आणि सनम पुरी हे भारतातले टॉपचे युट्युबर आहेत.