जगातलं सगळ्यात कंटाळवाणं काम कुठलं, असा प्रश्न विचारला तर बहुतेक सगळे लोक एका सुरात म्हणतील की, घरकाम! ज्या व्यक्तीने घरकाम केलेलं असेल त्याला ते किती रटाळ असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणजे घरातली कामं करणं आवश्यक तर असतंच, कारण त्याशिवाय घर नावाची संस्था चालूच शकत नाही. पण त्या कामाचं स्वरूप इतकं कंटाळवाणं असतं की ते करायला मनापासून आवडणं अनेकांसाठी जवळजवळ अशक्य असतं. त्याशिवाय घरकामाचा अजून एक मोठा वैताग म्हणजे स्वतःच्या घरातलं काम करण्याचे कोणी कोणाला पैसे देत नाही आणि बहुतेक वेळा तर त्याची कोणी दखलही घेत नाही.
म्हणजे रोज उठून केर काढायचा, फरशी पुसायची, भांडी घासायची, कपडे धुवायचे, ते वाळत घालायचे, त्यांच्या घड्या घालायच्या, भाजी आणायची, किराणा आणायचा, आंगण झाडायचं, घराबाहेर लॉन लावलेलं असेल तर ते कापायचं, झाडांना पाणी घालायचं, घरातल्या लहान मुलांची काळजी घ्यायची, घरातल्या वृद्ध आणि आजारी व्यक्तींकडे लक्ष द्यायचं ही कामं कधी संपतच नाहीत. घरातल्या तरुण आणि कर्त्या पिढीचा पुष्कळ वेळ याच कामांमध्ये जातो. त्यातही जगातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्ये या /nbvc कामाचा भर प्रामुख्याने महिलाच उचलताना दिसतात.ज्या देशांमध्ये मनुष्यबळ स्वस्त आहे तिथे जरा बऱ्या आर्थिक परिस्थितीतील माणसं घरकामाला मदतनीस ठेवतात. पण जिथे मनुष्यबळ सहज मिळत नाही किंवा ज्यांना ते परवडत नाही तिथे ही परिस्थिती अजूनच कठीण होऊन बसते. मग अशा परिस्थितीला उत्तर काय? - तर रोबोट्स! गेली अनेक वर्षं साय फाय सिनेमातून दिसणारे रोबोट्स आधी मोठ्या कारखान्यांमध्ये आणि आता तर थेट घरातसुद्धा यायला लागले आहेत. जिथे घरकामाला माणसं मिळत नाहीत किंवा मिळाले तरी त्यांच्या सेवा खूप महाग असतात अशा देशांमध्ये घर झाडणारा चपटा गोल रोबो अनेक घरांमध्ये बघायला मिळतो. तो अगदी कपाटाच्या आणि सोफ्याच्या खाली जाऊनसुद्धा तिथली धूळ काढतो. शिवाय तो सुट्ट्या घेत नाही, ऐनवेळी दांड्या मारत नाही, त्यामुळे लोकांना ते काम रोबोट्सकडून करून घेणं सोयीचं वाटतं आहे.
रोबोट्सकडून घरकाम करून घेणं हा ट्रेंड आता हळूहळू जगभर सगळीकडेच येणार आहे. इतकंच नाही तर येत्या १० वर्षांत ३९ टक्के घरकाम रोबोट्सकडून करून घेतलं जाईल, असं एका संशोधनातून दिसतं आहे. हे संशोधन इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड आणि जपानमधील ओकामिझु युनिव्हर्सिटी या दोन ठिकाणी करण्यात आलं. यात इंग्लंडमधील २९ तर जपानमधील ३६ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयातल्या तज्ज्ञांना विचारण्यात आलं की, “बिनपगारी घरकामाबाबतीत रोबोट्स काही बदल घडवून आणू शकतील का?” यावर तज्ज्ञांचं म्हणणं आहे, एकूण घरकामाच्या ३९ टक्के काम रोबोट्सकडे सोपवलं जाऊ शकतं. रोबोट्समुळे घरकामाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येईल. यासंदर्भात तज्ञांमध्येही काही प्रमाणात मतभेद दिसून आले. इंग्लंडमध्ये पुरुष तज्ज्ञांना रोबोट्स घरकाम करतील याबद्दल जास्त आशा वाटत होती, तर महिला तज्ज्ञांना हे चित्र कमी आशादायक वाटत होतं. मात्र त्याच वेळी जपानमध्ये स्त्री आणि पुरुष तज्ज्ञांचा दृष्टिकोन बरोब्बर उलटा होता.
अर्थात तंत्रज्ञानाच्या मदतीने कंटाळवाणी घरगुती कामं करून घेणं हा विचार कितीही आकर्षक असला, तरीही त्यात काही त्रुटीही आहेत. असं तंत्रज्ञान वापरण्यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तंत्रज्ञान बऱ्यापैकी महाग असतं. त्यावर काही जण म्हणतात की, ते काही काळानंतर स्वस्त होतं. तेही काहीसं खरं आहे, पण घरात सतत तंत्रज्ञान वापरण्यातला सगळ्यात मोठा धोका असा की, ही सगळी यंत्रं तुमचं बोलणं रेकॉर्ड करू शकतात आणि अनेक प्रकारचा डेटा साठवू शकतात किंवा तो पाठवूही शकतात.तंत्रज्ञानाच्या वापरातील या त्रुटींवर लवकरच उत्तरं शोधली जातील आणि जगभर महिलांवर असलेला या बिनपगारी घरकामाचा बोजा हे तंत्रज्ञान थोडं तरी कमी करेल, अशी आशा वाटू लागली आहे.
रोबोट्सना काळजी घेणं जमेल? इंग्लंड आणि जपानमध्ये एकाच वेळी केलेल्या या अभ्यासात एकूण ६५ आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ज्ञांच्या मुलाखती घेण्यात आल्या. रोबोट्स कुठल्या घरकामात माणसाला मदत करू शकतात, असं त्यांना विचारण्यात आलं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, किराणा माल खरेदी किंवा स्वच्छता करणं अशा कामांमध्ये माणसाला रोबोट्सची मदत होऊ शकते. मात्र घरातील लहान मुलांची किंवा वृद्ध आणि आजारी व्यक्तींची काळजी घेणं याकामी रोबोट्सचा उपयोग होईल का, याबाबत मात्र अजून साशंकताच आहे.