न्यूयॉर्क : साधारण दोन दशकांपूर्वी कॉम्प्युटरमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. मात्र, नंतर याच कॉम्प्युटरमुळे नवीन पिढीला मोठा रोजगारही उपलब्ध झाला होता. बऱ्याच कंपन्यांनी तेव्हा यांत्रिकीकरणामुळे हाती काम करणारे मनुष्यबळ कमी केले होते. आज पुन्हा औद्योगिक क्षेत्र या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. कारण आहेत रोबोट्स.
एका अहवालानुसार 2030 पर्यंत औद्योगिक क्षेत्रातील जगभरात 2 कोटी लोकांचे रोजगार जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास 8.5 टक्के कर्मचाऱ्यांची जागा हे रोबोट घेणार आहेत. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्समध्ये बुधवारी हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
सध्या मनुष्यबळाच्या तुलनेत रोबोट महाग आहेत. मात्र, 2011 ते 2016 दरम्यान या किंमतीमध्ये 11 टक्क्यांची घट झाली आहे. हे रोबोट वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त चांगल्या रितीने काम करण्यास सक्षम आहेत. दुसरीकडे मशीन निर्मित साहित्याची मागणीही वाढत चालली आहे.
ऑक्सफर्ड इकोनॉमिक्सनुसार ऑटोमेशनमध्ये वाढ होण्यात चीन पुढे आहे. ग्लोबल मॅन्युफॅक्चरींगमध्ये अग्रेसर राहण्यासाठी चीन रोबोटवर लक्ष केंद्रीत करत आहे. 2030 पर्यंत चीनमधील उद्योगांमध्ये रोबोटची संख्या 1.4 कोटींवर जाऊ शकते. ही संख्या जगभरातील अन्य कंपन्यांमधील रोबोटपेक्षा खूपच जास्त असेल.