नवी दिल्ली : एटीएम, नेट बँकिंग तसेच डेबिट कार्डच्या वापरातून २0१८-१९ या वर्षात फसवणुकीच्या प्रकारांमध्ये ५0 टक्के वाढ झाली आहे. यातून बँक खातेदारांची १४९ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले, अशी माहिती संसदेत देण्यात आली. त्याआधीच्या वर्षात फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण कमी होते, मात्र त्यातून लोकांची १६९ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती.
नेटबँकिंग, एटीएम व डेबिट कार्डचे क्लोनिंग, तसेच डेटाचोरी यांद्वारे फसवणुकीच्या सर्वाधिक घटना दिल्लीत घडल्या आहेत.देशात २0१८-१९ मध्ये फसवणुकच्या जितक्या घटना घडल्या, त्यापैकी तब्बल २७ टक्के एकट्या दिल्लीमधील आहेत. सर्वाधिक म्हणजे एक पंचमांश फसवणुकीचे प्रकार एटीएमद्वारे झाले आहेत. एटीएमचा पासवर्ड कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळवून खातेदारांच्या खात्यांतून मोठ्या रकमा काढण्यात आल्या. त्यातही सर्वाधिक फसवणुकीचे प्रकार सरकारी बँकांमधील आहेत.
अनेकदा लोक आपल्या एटीएमचा वा नेटबँकिंगचा पासवर्डबाबत आवश्यक ती गुप्तता पाळत नाहीत. मित्रांना वा जवळच्या व्यक्तींना तो दिला जातो. इतरांना पासवर्ड देऊ नये, अशा सूचना सर्वच बँका आपल्या ग्राहकांना देतात, पण ग्राहक ती काळजी घेत नाहीत, असेही आढळून आले आहे. मात्र, फसवणुकीचे प्रकार त्यामुळे झाले की, हॅकर्सनी डेटा चोरून फसवणूक केली, हे स्पष्ट व्हायचे आहे.शिवाय अनेक जण आपल्या मोबाइलमध्ये बँक खात्याचा क्रमांक व एटीएम पासवर्ड सेव्ह करतात. त्यातूनही फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात, असे बँकिंग क्षेत्रातील मंडळींचे म्हणणे आहे.
ओटीपीचा मार्ग
काही बँकांनी एटीएममधून रक्कम काढताना तुमच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) पाठविण्यास सुरुवात केली आहे. पासवर्डशिवाय हा ओटीपी त्या यंत्रात नोंदविला, तरच ती रक्कम मिळू शकते, अशी व्यवस्था आहे. शिवाय बँकेकडे जो मोबाइल क्रमांक नोंदविण्यात आला आहे, त्यावरच तो ओटीपी येतो. त्यामुळे एटीएम वा डेबिट कार्डद्वारे फसवणूक टळू शकते. अर्थात, आपला मोबाइल दुसऱ्यांच्या हाती दिला जाणार नाही, ही अपेक्षा त्यामध्ये आहे.