मुंबई, दि.२१- बदलत्या काळात शहरांमध्ये सुरक्षेचे विविध प्रश्न निर्माण होत आहेत, शहरातील काही भागांमध्ये ठराविक प्रकारचे गुन्हे सातत्याने होत असतात. त्यामुळे शहराच्या नवख्या भागात किंवा नव्या शहरात जाताना तेथील सुरक्षेच्या बाबी माहिती असणे आवश्यक ठरते. यासाठीच लोकांच्या अनुभवावर आधारित म्हणजे क्राऊडशेअरिंगवर चालणारे सेफसिटी अॅप तयार करण्यात आले आहे. सेफसिटी फाऊंडेशन आणि रेडडॉट फाऊंडेशन यांनी तयार केलेले सेफसिटी या अॅपचे मुंबईतील अमेरिकन वाणिज्यदुतावासात उद्घाटन करण्यात आले.
या अॅपमध्ये शहरातील विविध भागातील सुरक्षाविषयक समस्या, गुन्हे यांची माहिती लोकांनी शेअर करणे अपेक्षित आहे. अशी माहिती शेअर करण्यात आलेले प्रदेश लाल रंगाने हॉटस्पॉट म्हणून नकाशावर दाखवले जातात, त्यामुळे तेथे जाताना तेथील परिस्थितीचा अंदाज आपल्याला येतो. तसेच सुरक्षाविषयक भेडसावलेल्या प्रश्नाबाबत अनुभव वाचल्यामुळे काय काळजी घ्यायची याचीही माहिती मिळते. एखादा भाग दिवसाच्या ठराविक वेळी असुरक्षित होतो किंवा तेथे ठराविक प्रकारचे गुन्हे घडत असतात, ही माहिती लोकांच्या अनुभवातून या अॅपवर उपलब्ध होत असल्याने अशा भागात जाताना काळजी घेता येऊ शकते. सध्या जगातील सात देशांमध्ये हे अॅप वापरण्यात येत आहे.
अमेरिकन वाणिज्यदुतावासातील उपमुख्याधिकारी जेनिफर लार्सन यावेळेस म्हणाल्या, जगातील एक तृतियांश महिलांना आयुष्यात एकदातरी लिंगआधारीत हिंसेला सामोरे जावे लागते, वंशवादी गुन्हे, महिलांवरील अत्याचार सेफसिटी अॅपमुळे कमी होऊ शकतील. केवळ माहिती गोळा करुन ठेवणे हा या अॅपचा उद्देश नसून ती लोकांना देणे तसेच त्यांचे अनुभव शेअर करणे आणि शहरातील प्रदेश अधिकाधिक सुरक्षित कसे होतील यावर या अॅपचा भर आहे. महिलांना याचा मोठा लाभ होणार आहे असे रेड डॉटच्या कार्यकारी संचालक सुप्रीत सिंग यांनी सांगितले.