जवळपास प्रत्येक स्मार्टफोन आपल्या युजरची माहिती जमा करत असल्याचे आरोप होत असतांना एका रशियन कंपनीने तैगाफोन या नावाने जगातील सर्वात सुरक्षित स्मार्टफोन तयार केल्याचा दावा केला आहे.
आपण अजाणतेपणाने स्मार्टफोनच्या माध्यमातून आपली सर्व माहिती विविध कंपन्यांना देत असतो. यात स्मार्टफोन उत्पादकाकडे तर आपली डिजीटल कुंडली जमा असते. याशिवाय, विविध अॅप्लीकेशन्सही आपापल्या युजरची माहिती जमा करत असतात. अलीकडच्या काळात याबाबत मोठ्या प्रमाणात मंथन होऊ लागले आहे. विशेषत: एडवर्ड स्नोडेन आणि ज्युलिअन असांज यांच्यासारख्या जागल्यांनी यातील धोके अनेकदा जगासमोर अधोरेखित केले आहेत. या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी सायबर सुरक्षेतील मातब्बर नाव म्हणून ख्यात असणार्या जॉन मॅकअफी यांनी जगातील पहिला हॅकप्रूफ स्मार्टफोन सादर केला होता. यानंतर आता कॅस्परस्की लॅब या रशियन सायबर सुरक्षा संस्थेच्या सहसंस्थापिका नताल्या कॅस्परस्की यांनी तैगाफोन हा वापरण्यासाठी सुरक्षित असणारा सादर केला आहे.
तैगाफोनची खासियत म्हणजे हा वापरण्यासाठी अतिशय सुरक्षित असा आहे. हा स्मार्टफोन युजरची कोणतीही माहिती जमा करत नाही. यासोबत युजरच्या कोणत्याही डिजीटल हालचालीवर लक्षदेखील ठेवत नाही. एका अर्थाने हा जगातील पहिला सर्व्हायलन्स प्रूफ स्मार्टफोन असल्याचा दावा नताल्या कॅस्परस्की यांनी केला आहे. याशिवाय मालवेअर्सच्या बाह्य आक्रमणाला तोंड देण्यासाठी यात अतिशय सुरक्षित अशी प्रतिरोधक प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यात कोणतेही थर्ड पार्टी स्मार्टफोन अॅप्लीकेशन हे संबंधीत युजरची गोपनीय माहिती जमा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल्यास अलर्टच्या स्वरूपात याबाबतच इशारा त्याला देण्याची प्रणाली या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे यात अँटी थेप्ट प्रणालीदेखील असेल. याच्या मदतीने संबंधीत स्मार्टफोन हरविला तरी यातील माहिती कुणी त्रयस्थ व्यक्ती वापरू शकणार नाही. तसेच याचे अचूक लोकेशनदेखील कळू शकेल. विशेष म्हणजे याचे मूल्य किफायतशीर म्हणजेच सुमारे २६० डॉलर्सच्या आसपास असेल अशी माहिती नताल्या कॅस्परस्की यांनी दिली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जागतिक बाजारपेठेत हा स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.