ऑस्ट्रेलियन कॉम्पिटिशन अँड कंज्यूमर कमिशन (ACCC) नं एका प्रेस रिलीजमधून माहिती दिली आहे की, सात स्मार्टफोन्समधील वॉटर रेजिस्टेंस फीचरबाबत चुकीची मार्केटिंग केल्याची कबुली सॅमसंगनं दिली आहे. याबाबत खोट्या जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्यामुळे दक्षिण कोरियन कंपनीला दंड भरावा लागणार आहे.
सॅमसंगनं युजर्सना फसवलं
ACCC च्या तपासाअंती समोर आले आहे की, सॅमसंगनं मार्च 2016 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत 9 दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्या होत्या. या सर्व जाहिराती फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, सॅमसंग वेबसाईट आणि सॅमसंगच्या स्टोर्सवर चालवल्या जात होत्या. जाहिरातींमध्ये सॅमसंगचे फोन्स स्विमिंग पूल किंवा समुद्रात वापरता येतात, असं दाखवण्यात आलं होतं.
आता सॅमसंगनं मान्य केलं आहे की Galaxy S7, S7 Edge, A5 (2017), A7 (2017), S8, S8 Plus, आणि Note 8 हे फोन्स स्विमिंग पूल किंवा समुद्रातील पाण्यात गेल्यानंतर त्यांचं चार्जिंग पोर्ट बिघडतं. परंतु या जाहिरातींमुळे ऑस्ट्रेलियामध्ये हा फोन्सची विक्री वाढली होती. जेव्हा फोन्स बिघडू लागले तेव्हा ग्राहकांनी तक्रार करण्यास सुरुवात केली. काही युजर्सचे स्मार्टफोन तर पूर्णपणे निकामी होत होते.
दंडात्मक कारवाई
ग्राहकांच्या तक्रारींची दाखल घेत ACCC नं तपास सुरु केला. त्यानंतर सॅमसंगनं चुकीची जाहिरात केल्याचं मान्य केलं. त्यामुळे सॅमसंगला 14 मिलियन ऑस्ट्रेलीयन डॉलर्स इतका दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनात हा दंड सुमारे 75 कोटी रुपयांपेक्षा देखील जास्त आहे.