नवी दिल्ली : जेव्हापासून अॅपल कंपनीचे नवीन आयफोन्स लॉन्च करण्यात आले आहेत. तेव्हापासून प्रतिस्पर्धी अॅन्ड्राईड कंपन्यांनी अॅपल कंपनीची मजा उडविण्यास सुरुवात केली आहे. Huawei कंपनीने चिमटा काढत ट्विट केले होते आणि अॅपलच्या नव्या आयफोन्सला पहिल्यासारखेच ठेवल्यामुळे कंपनीचे आभार मानले होते. तसेच, कंपनीने नवीन आयफोन्स घेण्यासाठी रांगेत उभारणाऱ्या लोकांना मोफत पावर बँक दिले होते. आता यामध्ये सॅमसंग कंपनीने उडी घेतली आहे. सॅमसंग कंपनीने एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सॅमसंगचे काही अधिकारी ‘Appel’ नावाच्या जागी जातात आणि सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन वाटतात. तुमच्या माहितीसाठी Appel चा अर्थ Apple असा होतो. या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे की, कंपनीचे अधिकारी Samsung Galaxy S9 स्मार्टफोन येथील लोकांना वाटत आहेत. तसेच, जे लोक Samsung Galaxy S9 स्मार्टफोनचा वापर करतात, त्यांच्याकडून प्रतिक्रिया सकारात्मक येतात. व्हिडीओच्या शेवटी त्या जागेचे नाव बदलून सॅमसंग असल्याचे दाखविण्यात आले आहे. या व्हिडिओचे टायटल आहे, 'अॅपल कम्युनिटी स्विचेस टू सॅमसंग'. म्हणजेच अॅपल समुदायाला सॅमसंगमध्ये स्विच करण्यात आले आहे. सॅमसंग कंपनीचे अधिकारी नेदरलँडमधील एका भागात जातात. ज्याठिकाणी जवळपास 312 लोकसंख्या आहे. तसेच, येथील 50 लोकांना मोफत Samsung Galaxy S9 स्मार्टफोन देतात. दरम्यान, मार्केटिंगमध्ये एक पाऊल पुढे गेल्यामुळे कंपनीने स्मार्टफोन वाटण्यासाठी एका 18 वर्षीय अॅपल चाहत्याची मदत घेतली होती. व्हिडीओमध्ये सॅमसंग कंपनीने दावा केला आहे की, Samsung Galaxy S9 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशनच्या बाबतीत नवीन आयफोन्स पेक्षा चांगला आहे. दरम्यान, अॅपलने गेल्या काही दिवसांपूर्वी iPhone- XS, XS Max आणि XR लाँच केले होते.
सॅमसंगने 'या' गावात फुकट वाटले गॅलेक्सी S9 स्मार्टफोन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 2:07 PM