डिस्प्लेमधील संपूर्ण स्क्रीन वापरता यावी म्हणून स्मार्टफोन कंपन्या नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. यापूर्वी आपण स्मार्टफोनमध्ये पॉपअप, फ्लिप आणि रोटेटिंग कॅमेरे बघितले आहेत. यातील रोटेटिंग कॅमेऱ्याच्या प्रयोगाची पुनरावृत्ती सॅमसंग करणार आहे. परंतु यावेळी कंपनी रोटेटिंग कॅमेऱ्यासह एक फोल्डेबल स्मार्टफोन सादर करू शकते. सॅमसंग एका अनोख्या कॅमेरा मॉड्यूलसह फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करू शकते, अशी बातमी mysmartprice ने दिली आहे.
सॅमसंगने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनचे एक पेटंट वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी आर्गेनाइजेश (WIPO) मध्ये सादर केले आहे. या फोनमध्ये रोटेटिंग कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, असे या पेटंटवरून समजले आहे. सॅमसंगने फाईल केलेल्या पेटंटमध्ये रोटेटिंग कॅमेरा सेटअप दिसत आहे. हा कॅमेरा मॉड्यूल 180 डिग्री पर्यंत रोटेट होईल म्हणजे फिरेल. यामुळे या फोनमध्ये सेल्फी आणि रियर दोन्ही कॅमेरा सेटअपचे काम हा मॉड्यूल करेल. हा कॅमेरा सेटअप फोनच्या फ्रेममध्ये समाविष्ट केला जाईल. विशेष म्हणजे हा मॉड्यूल स्मार्टफोन फ्रेमच्या मध्यभागी किंवा कडेला देखील समाविष्ट करता येईल.
पेटंटनुसार या मॉड्यूलमध्ये मोशन सेन्सर आणि फोल्डिंग अँगल सेन्सर देण्यात येतील, त्यामुळे या कॅमेरा सेटअपला डिवाइसची स्थिती समजेल. फोन घडी करून ठेवण्यात आला असेल तर हा कॅमेरा त्यानुसार अड्जस्ट होऊन कॅमेरा अॅप उघडेल. आधीच नाजूक असलेल्या फोल्डेबल फोन्समध्ये अजून एका नाजूक कॅमेरा मॉड्यूलची भर पडल्यामुळे युजर्सना हे फोन्स अजून काळजीपूर्वक हाताळावे लागतील. सध्या फक्त या कॅमेरा मॉड्यूलचे पेटंट समोर आले आहेत, त्यामुळे हा फोन कधी लाँच होईलच असे नाही. कदाचित हा स्मार्टफोन फक्त पेटंट पुरता मर्यादित राहू शकतो.