सॅमसंग आपले स्वस्त स्मार्टफोन्स आपल्या ‘ए’ सीरिजमध्ये सादर करते. आता या सीरिजमधील सर्वात स्वस्त दोन मॉडेल्सची माहिती समोर आली आहे. यावर दक्षिण कोरियन इलेट्रॉनिक कंपनी मोठी तयारी करत असल्याचं दिसत आहे. सॅममोबाईलच्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये लो बजेट कॅटेगरीमध्ये Samsung Galaxy A04 आणि Galaxy A13s नावाचे दोन फोन्स सादर केले जाऊ शकतात.
आगामी सॅमसंग फोन्स
रिपोर्टनुसार, सॅमसंगचे दोन हँडसेट SM-A045F आणि SM-A137F मॉडेल नंबरसह बाजारात येऊ शकतात. हे फोन्स अनुक्रमे Galaxy A04 आणि Galaxy A13s नावाने ग्राहकांसमोर उपलब्ध होतील. विशेष म्हणजे हे फोन्स सॅमसंगच्या प्लांट्समध्ये बनणार नाहीत. यासाठी कंपनीनं चिनी कंपन्यांशी भागीदारी केली आहे. सॅमसंगनं मात्र या फोन्स बाबत कोणतीही माहिती दिली नाही.
Galaxy A13 चा नवीन व्हर्जन येतोय
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की सॅमसंग आणखी दोन स्मार्टफोन्सवर काम करत आहे. कंपनीनं अलीकडेच गॅलेक्सी ए13 आणि गॅलेक्सी ए23 स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. परंतु आता गॅलेक्सी ए13 चा एक नवीन व्हेरिएंट सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. त्यामुळे लवकरच नवीन गॅलेक्सी ए13 बघायला मिळू शकतो.
गॅलेक्सी ए13 चा नवा व्हेरिएंट ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशन वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. तिथे हा SM-A137F मॉडेल नंबरसह दिसला आहे, अशी माहिती टेक साइट MySmartPrice च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. या फोनचे 4G आणि 5G मॉडेल आधीपासून उपलब्द असल्यामुळे नव्या मॉडेलमध्ये कोणता बदल असेल हे काही सांगता येणार नाही.