जेव्हा भारतातील स्मार्टफोन्सचा मार्केट शेयर समोर येतो तेव्हा त्यात शाओमीचे नाव पहिल्या स्थानावर असते. ओप्पो, विवो आणि रियलमी या चिनी कंपन्या देखील टॉप 5 मध्ये येतात. परंतु जागतिक स्थरावर मात्र ग्राहक सॅमसंगला पसंती देत आहेत. अशी माहिती रिसर्च फर्म काउंटर पॉईंट रिसर्चच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या 5G स्मार्टफोन्सची यादी समोर आली आहे.
काउंटर पॉईंट रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए 52एस फेब्रुवारी 2022 मध्ये जगभरात सर्वाधिक विकला गेलेला 5G Android Smartphone आहे. विशेष म्हणजे हा डिवाइस ऑगस्ट 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. तसेच या यादीत सॅमसंगचे चार हँडसेट पहिल्या चार क्रमांकावर आहेत. यावरून सॅमसंगच्या जगभरातील लोकप्रियतेचा अंदाज येतो.
हे 5G फोन्स सर्वात जास्त विकले गेले
फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वाधिक विक्री झालेले 5G अँड्रॉइड स्मार्टफोन सॅमसंगचे होते. काउंटर पॉईंट रिसर्चच्या ग्लोबल टॉप 10 सर्वाधिक विकल्या गेलेल्या 5G अँड्रॉइड स्मार्टफोनच्या टॉप 10 लिस्टमध्ये गॅलेक्सी ए 52एस नं 2.90 % मार्केट शेअर मिळवला आहे. त्यांनतर 2.87 % मार्केट शेयरसह गॅलेक्सी एस22 अल्ट्रा 5जी आहे. गॅलेक्सी एस21-2.63 % आणि गॅलेक्सी ए 32 5जी-2.09 % मार्केट शेयरसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
या यादीत OPPO Reno7 5G 1.92 % मार्केट शेयरसह 5 व्या क्रमांकावर आहे. ऑनर 60 सहाव्या आणि विवो एस12 सातव्या स्थानावर आहे. तर शाओमीच्या सब ब्रँडचा रेडमी के40 स्मार्टफोन 8 व्या क्रमांकावर आहे. तर नववा क्रमांक ऑनर एक्स30 नं मिळवला आहे. दहावा क्रमांक देखील सॅमसंगच्या गॅलेक्सी ए22 5G नं मिळवला आहे.