सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी सी ९ प्रो या स्मार्टफोनच्या मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात केली असून यामुळे आता हे मॉडेल ग्राहकांना २९,९९० रूपयात मिळणार आहे.
सॅमसंग कंपनीने या वर्षाच्या जानेवारी महिन्यात भारतीय बाजारपेठेत तब्बल सहा जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असणारा गॅलेक्सी सी ९ प्रो हा स्मार्टफोन ३६,९०० रूपये मुल्यात सादर करण्याची घोषणा केली होती. यानंतर तब्बल पाच हजार रूपयांनी याचे मूल्य घटविण्यात आले होते. यातच आता पुन्हा दोन हजार रूपयांची याचे मूल्य कमी करण्यात आले आहे. परिणामी हा स्मार्टफोन आता ग्राहकांना २९,९९० रूपयात मिळणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो या मॉडेलमध्ये सहा इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले आहे. यात अत्यंत गतीमान असा ऑक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६५३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम सहा जीबी आणि स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने तब्बल २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. या मॉडेलमधील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे हे प्रत्येकी १६ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. फास्ट चार्जिंगसह यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली असून यात फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. याशिवाय यात वाय-फाय, जीपीएस, एनएफसी, ब्ल्यु-टुथ, युएसबी टाईप-सी पोर्ट आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.