सॅमसंग कंपनीने आपला सॅमसंग गॅलेक्सी जे ७ नेक्स्ट हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ११,४९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी जे ७ नेक्स्ट हे मॉडेल आधी बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी जे ७ या मॉडेलची सुधारित आवृत्ती आहे. अर्थात यात आधीपेक्षा अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. हे मॉडेल ग्राहकांना काळा आणि सोनेरी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केले असून ते कंपनीच्या वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे ७ नेक्स्ट हे मॉडेल मिड-रेंज म्हणजेच मध्यम किंमत पट्टयातील असून यातील फिचर्सही याच प्रकारचे आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी जे ७ नेक्स्ट या स्मार्टफोनमधील सुपर अमोलेड डिस्प्ले हा पाच इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा असेल. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. सॅमसंग गॅलेक्सी जे ७ नेक्स्ट हा स्मार्टफोन ड्युअल सीमकार्डला सपोर्ट करणारे असून यात फोर-जी एलटीई नेटवर्क कनेक्टिव्हिटी असेल. उर्वरित फिचर्समध्ये वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदींचा समावेश आहे. तर यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असेल. सॅमसंग कंपनीच्या जे मालिकेतील अन्य स्मार्टफोनप्रमाणे सॅमसंग गॅलेक्सी जे ७ नेक्स्ट या मॉडेलमध्येही काढता येणारे प्लास्टीकचे कव्हर प्रदान करण्यात आले आहे.
दरम्यान, सॅमसंग कंपनी पुढील महिन्यात आपले बहुप्रतिक्षित गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल लाँच करणार असल्याचे वृत्त आहे. याच कार्यक्रमात बिक्सबी या आर्टीफिशियल इंटिलेजियन्स असिस्टंटने सज्ज असणारे वायरलेस इयरबडस्देखील लाँच करण्यात येतील असे मानले जात आहे.