सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी जे ७ प्राईम २ या स्मार्टफोनच्या मूल्यात कपात करण्याचे जाहीर केले आहे. या वर्षाच्या मार्च महिन्यात गॅलेक्सी जे ७ प्राईम २ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी १३,९९० रूपये मूल्यात सादर करण्यात आला होता. यात आता तब्बल दोन हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे हे मॉडेल ग्राहकांना ११,९९० रूपयात खरेदी करता येणार आहे. गोल्ड आणि ब्लॅक या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये याला फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले आहे. वाढत्या स्पर्धेमुळे या मॉडेलच्या मूल्यात कपात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. किंमत कमी केल्यानंतर आता सॅमसंगचा हा स्मार्टफोन ऑनर ९ एन, रिअरमी १, शाओमी रेडमी नोट ५ आणि असुसच्या झेनफोन मॅक्स प्रो एम१ या मॉडेल्सला आव्हान देण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोअर एक्झीनॉस ७ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. यात एलईडी फ्लॅश आणि एफ/१.९ अपर्चरयुक्त १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठीही यात १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे.
सोशल कॅमेरा अॅप हे स्वतंत्र कॅमेरा अॅप देण्यात आले आहे. याच्या मदतीने कॅमेर्यातून काढलेले कोणतेही चित्र इन्टंट एडिट करून शेअर करता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे७ प्राईम २ या स्मार्टफोनमध्ये ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तसेच यात सॅमसंग मिनी पे हे अॅपदेखील प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.