सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस ८ या स्मार्टफोनमध्ये काही बदल करून याला नवीन स्वरूपात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या मॉडेलची नवीन आवृत्ती येणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र याच्या नावात गॅलेक्सी एस ८ दर्शविण्यात आलेले नाही. याऐवजी याला गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशन या नावाने बाजारपेठेत उतारण्यात येणार आहे.यामध्ये मूळ मॉडेलनुसार एज-टू-एज या प्रकारातील डिस्प्ले व फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले असले तरी मात्र हार्ट रेट सेन्सरची सुविधा नसेल. यात अन्य सर्व फिचर्स समान असले तरी मूळ मॉडेलपेक्षा ते कमी क्षमतेचे असणार आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅश, ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि एफ/१.८ अपर्चरयुक्त १२ ड्युअलपिक्सल क्षमतेचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये एलईडी फ्लॅश आणि एफ/१.७ अपर्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यामध्ये वायर आणि वायरलेस या दोन्ही प्रकारातील चार्जींगच्या सपोर्टने सज्ज असणारी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ८ अर्थात ओरियो आवृत्तीवर चालणारा असेल. हे मॉडेल पहिल्यांदा चीनमध्ये लाँच करण्यात आले असून ते लवकरच भारतात सादर होण्याची शक्यता आहे.
सॅमसंगच्या गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनची घोषणा
By शेखर पाटील | Published: May 22, 2018 1:13 PM