अन्य मातब्बर कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता सॅमसंग कंपनीदेखील स्मार्ट स्पीकर लाँच करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गत अनेक महिन्यांपासून सॅमसंग कंपनीदेखील स्मार्ट स्पीकर सादर करणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. या कंपनीने ब्रँड नेमसाठी केलेल्या अर्जातून ही माहिती उघड झाली आहे. याचा विचार करता, सॅमसंगचा आगामी स्मार्ट स्पीकर हा मॅगबी या नावाने बाजारपेठेत उतारण्यात येणार आहे. ८ ऑगस्ट रोजी ही कंपनी गॅलेक्सी नोट ९ या स्मार्टफोनसह विविध प्रॉडक्टची घोषणा करणार असून यात मॅगबीचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट हा आता जगभरातील कोट्यवधी नागरिकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीवर चालणार्या या असिस्टंटला आता स्मार्टफोनसह विविध स्मार्ट उपकरणांवरून वापरले जात आहे. यात अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेले माध्यम म्हणजेच स्मार्ट स्पीकर होय. अमेझॉनचा अलेक्झा, अॅपलचा सिरी आणि गुगलच्या गुगल असिस्टंटवर चालणारे स्मार्ट स्पीकर्स सध्या बाजारपेठेत खूप लोकप्रिय झाले आहेत. याच अमेझॉन इको, गुगल होम आणि अॅपल होमपॉड या उपकरणांना तगडे आव्हान देण्यासाठी सॅमसंग मॅगबी हे मॉडेल बाजारपेठेत दाखल होणार असल्याचे आता दिसून येत आहे. हा स्मार्ट स्पीकर सॅमसंगने विकसित केलेल्या बिक्सबी या डिजीटल असिस्टंटवर आधारित असेल. बिक्सबीला पहिल्यांदा सॅमसंगने आपल्या प्रिमीयम स्मार्टफोन्समध्ये सादर केले होते. यानंतर याला आता मिड-रेंजमधील स्मार्टफोनमध्येही देण्यात येत आहे. यातच आता याला स्मार्ट स्पीकरच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहे.
अन्य स्मार्ट स्पीकरप्रमाणे याचा उपयोग माहिती आणि मनोरंजनासाठी होणार आहे. तसेच याला स्मार्टफोनसह घरातील विविध उपकरणे कनेक्ट करता येणार आहेत. याचे मूल्य सुमारे २०० डॉलर्स इतके असणार आहे. याला अमेरिका, युरोपसह भारत आणि चीनी बाजारपेठेत उतारण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.