सॅन डिस्कने भारतीय युजर्ससाठी तब्बल ४०० जीबी साठवण क्षमत असणारे एसडीएक्ससी मेमरी कार्ड सादर केले आहे. वेस्टर्न डिजिटल कंपनीचा ब्रँड असणार्या सॅन डिस्कने अल्ट्रा ४०० जीबी मायक्रोएसडीएक्ससी हे मेमरी कार्ड भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यात तब्बल ४०० जीबी इतक्या स्टोअरेजची सुविधा देण्यात आली आहे. याचे मूल्य १९,९९९ रूपये असून हे कार्ड ग्राहकांना फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या शॉपींग पोर्टल्सवरून उपलब्ध करण्यात आले आहे. हे कार्ड ‘अॅप्लीकेशन क्लास १ (ए१)’ या मानकावर आधारित असून ते अतिशय वेगवान प्रोसेसिंग करत असल्याचे सानडिस्कने नमूद केले आहे. यामध्ये १०० मेगाबाईट प्रति-सेकंद इतक्या गतीने माहितीचे वहन होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. अर्थात यामुळे युजर एका मिनिटाला सुमारे १२०० प्रतिमांना यावर सेव्ह करू शकतो. यामध्ये असणार्या वाढीव स्टोअरेज क्षमतेमुळे यात जवळपास ४० तासांचे फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओ सेव्ह करता येतील.
सॅन डिस्कचे हे नवीन मेमरी कार्ड स्मार्टफोनमध्ये अतिशय कार्यक्षमरित्या वापरता येणार आहे. यासाठी कंपनीने स्वतंत्र ‘मेमरी झोन अॅप’ सादर केले असून याच्या माध्यमातून स्टोअरेजवर उत्तम कंट्रोल ठेवता येणार आहे. यामध्ये विविध फाईल्सचे लोकेशन पाहून याचा बॅकअप घेण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. अँड्रॉइड युजर याला गुगल प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून वापरू शकतात. विशेष बाब म्हणजे हे मेमरीकार्ड वॉटरप्रूफ, टेंपरेचरप्रूफ, शॉकप्रूफ आणि एक्स-रे प्रूफ असल्यामुळे कोणत्याही वातावरणात अगदी सहजपणे वापरता येणार आहे.