एचपी कंपनीने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी ओमेन १५ आणि ओमेन १७ या गेमिंग लॅपटॉपची नवीन मालिका बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. वर नमूद केल्यानुसार एचपी ओमेन १५ आणि एचपी ओमेन १७ हे लॅपटॉप खास करून गेमर्ससाठी सादर करण्यात आले आहेत. यातील एचपी ओमेन १५ या मालिकेत सीई०७०टिएक्स, सीई०७१टिएक्स, सीई०७२टीएक्स, सीई०७३टिएक्स व सीई०७४टिएक्स हे चार मॉडेल्स असून याचे मूल्य ८०,९९० रूपयांपासून सुरू होणारे आहे. तर एचपी ओमेन १७ मालिकेत एएन००९टिएक्स आणि एएन०१० टिएक्स या दोन मॉडेल्सचा समावेश असून त्याचे मूल्य १,५९,९९० रूपयांपासून सुरू होणारे असेल.
एचपी ओमेन १५ या मालिकेत सातव्या पिढीतील कोअर आय-५ व आय-७ प्रोसेसर देण्यात आले आहेत. याला एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५० ग्राफीक कार्डची जोड असेल. यात ८ व १६ जीबी रॅमचे तर स्टोअरेजसाठी एक टेराबाईटपर्यंतचे पर्याय असतील. याच्या विविध व्हेरियंटमध्ये १५.६ इंच आकारमानाच्या फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) आणि अल्ट्रा हाय डेफिनेशनचे (३८४० बाय २१६० पिक्सल्स) डिस्प्ले देण्यात आलेले आहेत. तर एचपी ओमेन १७ या मालिकेत १७.३ इंच आकारमानाचे आणि फुल एचडी क्षमतेचे डिस्प्ले असतील. यात सातव्या पिढीतील इंटेल कोअर आय-७ प्रोसेसर असून याला एनिव्हडीया जीफोर्स जीटीएक्स १०७० ग्राफीक प्रोसेसरची जोड असेल. यात ३२ जीबीपर्यंत रॅम तर एक टेराबाईटपर्यंतच्या स्टोअरेजचे पर्याय आहेत.
या दोन्ही मालिकेतील लॅपटॉप हे एचपी कंपनीच्या ऑडिओ बुस्ट २.० आणि बँग अँड ओलुफ्सेन तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. यामुळे यात अतिशय उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभुती घेता येते. यात व्हिआर रेडी तंत्रज्ञानाचा सपोर्ट असल्यामुळे ३६० अंशातील गेमिंगचा आनंद घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.