एनव्हिडीया कंपनीने आरटी या मालिकेतील विविध ग्राफीक प्रोसेसर्स लाँच केले असून याच्या मदतीने अतिशय उच्च ग्राफीक्सयुक्त गेमिंगचा आनंद घेता येणार आहे. गेमींगसाठी असणार्या उपकरणांमध्ये ग्राफीक प्रोसेसर हा अविभाज्य घटक आहे. अलीकडच्या काळात भारतात गेमींगची लोकप्रियता वाढत असून अनेक लॅपटॉप आणि डेस्कटॉपचे मॉडेल्स खासकरून गेमर्ससाठी विकसित करण्यात येत आहेत. यामध्ये नियमित प्रोसेसरच्या जोडीला ग्राफीक प्रोसेसर दिलेला असतो. ग्राफीक प्रोसेसरच्या उत्पादनात आघाडीवर असणार्या एनव्हिडीया कंपनीने आता नव्या पिढीतील गतीमान प्रोसेसर्स सादर केले आहे.
एनव्हिडीयाचे सीईओ जेन सुन हुंग यांनी एका कार्यक्रमात एनव्हिडीया जीफोर्स आरटीएक्स २०७०, आरटीएक्स २०८० आणि आरटीएक्स २०८० टिआय या तीन जीपीयू अर्थात ग्राफीक प्रोसेसर युनिटचे अनावरण केले. यांचे मूल्य ४९९ डॉलर्सपासून सुरू होणारे आहेत. अर्थात हे जीपीयू अतिशय महागडे आहेत. तथापि, यांचे मूल्य जास्त असले तरी यामध्ये अतिशय उच्च दर्जाचे फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. याला टुरींग या तंत्रज्ञानावर आधारित पध्दतीत विकसित करण्यात आले आहे. यामध्ये 'रिअल टाईम रे ट्रेसींग'सह 'एआय' म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे एनव्हिडीयाच्या आधीच्या (पास्कल) मालिकेतील प्रोसेसरपेक्षा हे तब्बल सहा पटींनी गतीमान असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अलीकडे बहुतांश गेम्समध्ये 'फोर-के', एचडीआर दर्जाच्या चित्रीकरणाचा वापर केलेला असतो. यासाठी हे प्रोसेसर उपयुक्त ठरणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रॉडक्टबाबत घोषणा करत असतांना ईए, ४ए गेम्स आणि इडॉस या विख्यात कंपन्यांच्या काही गेम्सचे सादरीकरणही करण्यात आले. यात या प्रोसेसर्सची अतिशय उच्च गुणवत्ता दिसून आली आहे. लवकरच या ग्राफीक प्रोसेसर्सला लॅपटॉप, डेस्कटॉप आदी उपकरणांमध्ये वापरण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.