शाओमी कंपनीने आपल्या मी नोट ३ या फ्लॅगशीप मॉडेलचे अनावरण केले असून यात सहा जीबी रॅमसह ड्युअल कॅमेरा सेटअपचा समावेश असेल.
शाओमी मी नोट ३ हे मॉडेल कंपनीने या वर्षाच्या प्रारंभी सादर केलेल्या मी ६ या मॉडेलची अद्ययावत आवृत्ती असल्याचे मानले जात आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर असून याची रॅम सहा जीबी असून स्टोअरेजसाठी ६४ आणि १२८ जीबी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. तर यातील डिस्प्ले हा ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१०८० बाय १९२० पिक्सल्स) क्षमतेचा असेल. मात्र शाओमी मी नोट ३ या मॉडेलमध्ये मायक्रो-एसडी कार्डची सुविधा नसल्याने स्टोअरेज वाढविता येणार नाही.
शाओमी मी नोट ३ या मॉडेलच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. यातील एका कॅमेर्यात वाईड अँगल लेन्स, एफ/१.८ अपार्चर आणि ४-अॅक्सीस ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन हे फिचर्स असतील. तर दुसर्या कॅमेर्यात टेलिफोटो लेन्ससह एफ/२.६ अपार्चर देण्यात आलेले आहे. या दोन्ही कॅमेर्यांना एकत्रीतपणे २-एक्स ऑप्टीकल झूम आणि पीडीएएफ फिचर दिलेले आहे. याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात २-मायक्रॉन पिक्सलसह १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. यातील फ्रंट कॅमेर्यात *अॅडाप्टेबल एआय ब्युटिफाय* ही शाओमी कंपनीने विकसित केलेली प्रणाली असेल. याच्या अंतर्गत कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून सेल्फी प्रतिमांना अतिशय उत्तम पध्दतीने सुशोभित करता येणार आहे.
विशेष म्हणजे यात स्त्री आणि पुरूष या दोघांसाठी स्वतंत्र अलॉगरिदम देण्यात आले आहेत. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.