शाओमी कंपनी गुरूवारी रेडमी 5 व रेडमी 5 प्लस या दोन अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारे स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे वृत्त आहे. या अनुषंगाने कंपनीचे प्रवक्ते डोनोव्हान सुंग यांनी या दोन्ही मॉडेल्सचा टिझर जारी केला आहे. तर विविध माध्यमांमधून याचे फिचर्सदेखील जगासमोर आले आहेत. परिणामी हे दोन्ही स्मार्टफोन्स नेमके कसे असतील याची चुणूक दिसून आली आहे. सुंग यांनी जाहीर केलेल्या प्रतिमेत 18:9 अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिसत असून याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर दर्शविण्यात आले आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या बाह्यांगांमध्ये काहीही फरक दिसत नसल्याने फिचर्सनुसार रेडमी 5 व रेडमी 5 प्लस हे अंतर्गत फिचर्सच्या माध्यमातून थोडे भिन्न असतील असे मानले जात आहे.
बेंचमार्किंग करणार्या संकेतस्थळावर शाओमी कंपनीने सादर केलेल्या माहितीनुसार शाओमी रेडमी 5 व रेडमी 5 प्लस या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5.7 इंच आकारमानाचा आणि 720 बाय 1440 पिक्सल्स (एचडी प्लस) क्षमतेचा डिस्प्ले असेल. यातील रेडमी 5 या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 450 वा 625 प्रोसेसर असू शकतो. तर रेडमी 5 प्लस या मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 625 वा 630 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. यातील रेडमी 5 या मॉडेलमध्ये 12 व 5 मेगापिक्सल्सचे कॅमेरे तर 3200 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असू शकते. या मॉडेलमध्ये 2, 3 आणि 4 जीबी रॅमचे पर्याय असून याला 16, 32 आणि 64 जीबी स्टोअरेजची जोड देण्यात आलेली असेल. या सर्व व्हेरियंटमध्ये
मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा असेल. तर दुसरीकडे शाओमी रेडमी 5 प्लस या मॉडेलमध्ये वाढीव रॅम आणि स्टोअरेजचे पर्याय असतील. यातील बॅटरी 4 हजार मिलीअँपिअर क्षमतेची असू शकते. शाओमी रेडमी 5 व रेडमी 5 प्लस हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट 7.1.2 या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा एमआययुआय ९ हा युजर इंटरफेस असेल. हे दोन्ही मॉडेल्स किफायतशीर दरातील असण्याची शक्यता असून याचे सर्व फिचर्स आणि मूल्य ७ डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहेत.