कॅलिफोर्निया : व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर नाराज झालेले युझर्स सिग्नल अॅपकडे मोठ्या प्रमाणावर वळलेले पाहायला मिळाले. मात्र, अल्पावधीतच सिग्नल अॅप मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड झाल्याचा फटका युझर्सना बसला. सिग्नल अॅप काही वेळातच डाऊन झाले. अॅप वापरण्यात अडचणी येत असल्याची तक्रार अनेकांकडून करण्यात आली.
सिग्नल अॅप डाऊन झाले असल्याला कंपनीकडून अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आला. अॅप वापरात अडचणी येत असल्याच्या तक्रारी युझर्सकडून करण्यात आल्या. सिग्नल अॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. त्या दूर करून शक्य तितक्या लवकर सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
एका दिवसांत हजारो नवीन युझर्स आले आहेत. नवीन सर्वर्स आणि अधिक क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. कंपनीच्या अपेक्षेपेक्षा अधिक युझर्स वाढल्याने काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे, असेही सिग्नल अॅपकडून सांगण्यात आले.
दरम्यान, व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर जगभरातील युझर्सनी नाराजी व्यक्त करत आपला मोर्चा सिग्नल आणि टेलिग्राम अॅपकडे वळवला. गेल्या काही दिवसांत अडीच कोटींहून अधिक टेलिग्राम अॅप डाऊनलोड करण्यात आले. यातील सर्वांत जास्त ३८ टक्के युझर्स आशियातील होते, अशी माहिती मिळाली आहे.
तत्पूर्वी, WhatsApp ने नवीन प्रायव्हसी पॉलिसी पुढील तीन महिन्यांसाठी लांबवणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हॉट्सअॅप युझर्सना दिलासा मिळाला आहे. आता, ८ फेब्रुवारीला कोणत्याही युझरचे अकाऊंट बंद होणार नाही. चौफेर होणारी टीका आणि विरोधानंतर व्हॉट्सअॅपने आता एक पाऊल मागे घेत नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.