दर्जेदार लाईफस्टाईल ब्रँड म्हणून ख्यात असणार्या स्कागेनने भारतात फालस्टर हे उच्च श्रेणीतील स्मार्टवॉच दोन व्हेरियंटमध्ये सादर केले आहे.
डेन्मार्कमध्ये मुख्यालय असणार्या स्कागेनने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमिवर स्कागेनने फालस्टर या मालिकेतील दोन स्मार्टवॉच भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहे. यांतील फालस्टर स्टील मेशचे (एसकेटी ५०००) मूल्य १९,९९५ तर फालस्टर लेदर मेशचे (एसकेटी ५००१) मूल्य २१,९९५ रूपये आहे. देशभरातील निवडक शॉपीजमधून ग्राहकांना हे स्मार्टवॉच खरेदी करता येणार आहे. या मॉडेल्समध्ये स्टाईल, लूक आणि युटिलिटी यांचा संगम असल्याचे दिसून येत आहे. अर्थात हे स्मार्टवॉच दिसण्यास अतिशय आकर्षक असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात अतिशय मजबूत अशी स्टील बॉडी असून हे मॉडेल वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ असल्यामुळे कोणत्याही वातावरणात सहजपणे वापरता येणार आहे. तर स्मार्टवॉच मॉडेल्समध्ये पट्टे बदलण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.
स्कागेनच्या या दोन्ही मॉडेल्समध्ये टचस्क्रीन डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच अँड्रॉइड वेअर २.० या प्रणालीवर चालणारे असून यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन २१०० हा वेअरेबल्ससाठी विकसित करण्यात आलेला प्रोसेसर देण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच अँड्रॉइड आणि आयओएस या प्रणालींवर चालणार्या स्मार्टफोनला कनेक्ट करता येते. यानंतर यात संबंधीत स्मार्टफोनवरून कॉल करणे वा कॉल रिसिव्ह करणे, संदेशांची देवाण-घेवाण आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. यात कॉल, मॅसेजेस आणि ई-मेल्स आदींचे नोटिफिकेशन्स मिळतील. यात अॅक्टीव्हिटी ट्रॅकरदेखील आहे. अर्थात हे स्मार्टवॉच फिटनेस ट्रॅकर म्हणूनही वापरता येतील. यात इनबिल्ट जीपीएस असून युजरच्या हृदयाचे ठोके मोजण्याची सुविधादेखील दिलेली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात गुगल असिस्टंट देण्यात आला असून याच्या मदतीने युजर व्हाईस कमांडचा वापर करू शकतो.