बिंज वॉचिंग सिंड्रोममध्ये कुणीही अडकू शकतं. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत. आणि या प्रवासातील सगळ्यात मोठी अडचण असते ती मॅरेथॉन व्ह्यूईंग. आपल्या लक्षात येत नाही पण आपण जर वेळ लावून OTT चॅनल्स बघितले तर लक्षात येईल की आपला किती प्रचंड वेळ यात जातो. विकएंडलाही बिंज वॉचिंगचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहेच ,पण आता कोरोनामुळे सगळंच आयुष्य ऑनलाईन झाल्यापासून कामाच्या दिवसांमध्ये ही OTT चॅनल्स बघण्याकडेही अनेकांचा कल असल्याचं दिसून येतं. मॅरेथॉन व्ह्यूईंग हा यातला सगळ्यात मोठा अडथळा. त्यामुळे शरीराचं चक्र बिघडतं. रात्री ९/१० पासून पहाटे ५/६ वाजेस्तोवर असं रोज किंवा आठवड्यातून तीन चार दिवस जर कुणी सीरियल आणि सिनेमे बघत असेल तर त्याच्या झोपेचं, पचन व्यवस्थेचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. २०१७ मध्ये नेटफ्लिक्सचे सीईओ रिड हेस्टिंग्स यांनी नेटफ्लिक्सची स्पर्धा माणसांच्या झोपेशी असल्याचं म्हटलं आहे. खरंतर फक्त नेटफ्लिक्सच नव्हे, तर तमाम आभासी जग माणसांच्या झोपेशी स्पर्धा करतंय. माणसं जितकी कमी झोपतील ; या चॅनल्सचा नफा तितका वाढणार हे सरळ गणित आहे. थोडं थांबा... १) बिंज वॉचिंग सिंड्रोम मधून बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आहे : थोडं थांबा. टेक अ ब्रेक. सलग किती तास आपण सीरियल आणि सिनेमे बघणार आहोत याचा विचार करून एक नियम करा. वेळेची ही शिस्त काटेकोरपणे पाळा. २) बिंज वॉचिंगसाठी हातातली महत्त्वाची कामे आपण बाजूला ठेवू लागलो आहोत का याकडे लक्ष असू द्या. जर तसं होत असेल तर तो रेड अलर्ट आहे. ३) आपल्याला सतत मनोरंजनाची गरज नसते. त्यामुळे व्यायाम, काम, घरकाम, सकस जेवण, व्यवस्थित झोप, पुस्तक वाचन, आवडतं संगीत ऐकणं, मित्रमैत्रिणी, कुटुंबीय यांच्याशी ऑनलाईन / ऑफलाईन गप्पा मारणं या गोष्टी चुकून ही बाजूला ठेवू नका. ४) सीरियल आणि सिनेमे ज्या त्या चॅनल्स वरुन कुठेही जात नसतात. ते तिथेच असणार आहेत. त्यामुळे आरामात, हळूहळू एकेक करुन बघितलं तरी चालण्यासारखं असतं. बकाबका सगळं बघून टाकण्याची गरज नाही. पुढच्या भागात : पेरेंटल कंट्रोल्स कसे वापरावेत ?
नेटफ्लिक्सचा खरा स्पर्धक कोण?- झोप !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 5:22 AM