दिवसेंदिवस स्मार्टफोन्सच्या स्क्रीन्सचा आकार वाढत आहे. त्यासाठी कंपन्या विविध प्रयोग करत आहेत. पण मोठ्या स्क्रीन साईजच्या लाटेविरुद्ध जात जगातील सर्वात छोटा 4G स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन इतका छोटा आहे कि तळहातावर आणि एका मुठीत सहज मावतो. या फोनचे नाव Mony Mist आहे आणि हा जगातील सर्वात छोटा 4G SmartPhone असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मॉनी मिस्ट हा मोबाईल फोन Apple कंपनीचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांच्या आठवणीत बनवण्यात आला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची डिजाईन iPhone 4 सारखी दिसते. Mony Mist ची निर्मिती क्राउडफंडिंगच्या माध्यमातून करण्यात येईल. हा फोन सुरुवातीला 99 डॉलर म्हणजे सुमारे 7,400 रुपयांमध्ये उपलब्ध होईल आणि त्यानंतर याची किंमत 150 डॉलर म्हणजे सुमारे 11,200 रुपये केली जाऊ शकते.
Mony Mist चे स्पेसिफिकेशन्स
जगातील सर्वात छोट्या 4जी स्मार्टफोन Mony Mist चा आकार 89.5 x 45.5 x 11.5एमएम आहे. या फोनमध्ये 3 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 480 x 854 पिक्सल आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड 9 ओएस देण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक एमटी6735 चिपसेटवर चालतो. मॉनी मिस्टमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
Mony Mist मध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये वीजीए फ्रंट कॅमेरा मिळतो. हा 4जी फोन ड्युअल सिम स्मार्टफोन वाय-फाय आणि ब्लूटूथ 4.0 ला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Mony Mist मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्टसह 1,250एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.