अनिल भापकर
आमच्या लहानपणी कोणी मुलांना खेळाची नावे सांगा म्हटलं कि मुलं पटापट कब्बडी ,खो-खो, लपाछपी ,क्रिकेट ,कॅरम ,चेस आदी खेळांची नावं सांगायची . हल्लीच्या मुलांना खेळाची नावं सांगा म्हटलं कि हि मुलं लगेच पबजी ,कँडीक्रश , स्पीड रेसिंग, अँग्री बर्ड, टेम्पल रन, स्नेक, कार रेस, तीनपत्ती आदी स्मार्टफोन गेम्सची नाव घेतात.
हे असे का घडते ?
आजच्या पिढीतील मम्मी पप्पा हे पूर्वीच्या आईबाबांच्या तुलनेने डिजिटली अधिक स्मार्ट आहेत . त्यामुळे ह्या टेक्नोसॅव्ही काळात घरातील प्रत्येक मोठ्या माणसांकडे स्मार्टफोन हा असतोच. काही जण तर दोन-दोन स्मार्टफोन बाळगतात . घरातले हे मोठे जेव्हा ऑफिस मधून घरी येतात तेव्हा घरी आल्यावर एकमेकांशी गप्पा मारण्याऐवजी आपापल्या स्मार्टफोन मध्ये डोकं घालून बसतात . हे सगळे घरातील लहान मुलं बघत असतात. खरं तर लहान मुलांची आणि स्मार्टफोनची ओळख हि जन्मतःच होते कारण बाळाचा जन्म झाला कि मामा ,काका ,पप्पा ,आत्या असे एक ना अनेक नातेवाईक लगेच त्या कोवळ्या जीवासोबत सेल्फी काढायला सुरुवात करतात . मुलं थोडी मोठी झाली कि घरातील व्यक्तीला त्यांच्या कामात डिस्टर्ब करते म्हणून त्याला स्मार्टफोन वर कार्टून लावून दिली जातात . आईलाही तिची कामे भरभर आवरण्याची मोकळीक मिळते . मग मुलं त्यात एवढी गुरफटून जातात कि त्यांना खाण्यापिण्याचेही भान राहत नाही. मग हीच मुलं थोडं मोठी झाली कि स्मार्टफोनवर फोटो काढण्यापासून ते गेम्स डाउनलोड करणे आणि तासंतास खेळणे यात अगदी पारंगत होऊन जातात .मग घरातील वडीलधारी मंडळी घरी आली कि हि मुलं त्यांच्याशी बोलण्याऐवजी त्यांना त्यांचा स्मार्टफोन हवा असतो आणि जर दिला नाही तर हि लहान मुलं लगेच रडून सगळं घर डोक्यावर घेतात.
स्मार्टफोन लहान मुलांसाठी हानिकारकच
१. एकटक स्क्रीनकडे पहात राहिल्याने डोळ्यांवर ताण येतो व डोळे कोरडे होतात त्यामुळे कमी वयात चष्मा लागण्याची शक्यता असते.
२. स्मार्टफोन मधील हिंसक गेम्स मुळे मुलांची प्रवृत्ती हिंसक होऊ शकते .
३. एका जागेवर बसून स्मार्टफोनवर गेम्स खेळायची सवय लागल्यामुळे मैदानी खेळ व त्यातील चुरस याला हि मुलं पारखी होतात .तसेच शारीरिक श्रम नसल्यामुळे याचा आरोग्यावर परिणाम सुद्धा होतो .
४. फोनवर सतत खेळत बसल्याने मुलांचा आई वडिलांशी तसेच मित्रांशी संवाद कमी होत जातो त्यामुळे हि मुले एकलकोंडी होत जातात व पुढे पालकांपासून दूराऊ शकतात .
५. लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिल्यामुळे चुकून कोणाला कॉल लागू शकतो किंवा मेसेज फॉरवर्ड होऊन समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे मुलांना स्मार्टफोन पासून हळूहळू दूर करणे हे पालकांचे कर्तव्य नव्हे तर गरज आहे. त्याला इतर खेळात गुंतवून तसेच त्याच्याशी गप्पा मारून किंवा पालकांना वेळ असल्यास मुलांना खेळाच्या मैदानावर घेऊन जायला हवे. एकीकडे खेळाची मैदाने नाहीत म्हणून आपण ओरड करतो मात्र जी काही थोडी फार मैदाने आहेत त्यावर तरी मुलं खेळायला येतात का हे आपण बघतच नाही.
anil.bhapkar@lokmat.com